
सामना ऑनलाईन,मॉस्को
फिफा वर्ल्ड कपमध्ये आज अर्जेंटिना व आइसलॅण्ड यांच्यामध्ये ‘ड’ गटातील लढत रंगणार आहे. याप्रसंगी या दोन देशांमधील लढतीत जगभरातील तमाम फुटबॉलप्रेमींचे आकर्षण असणार आहे स्टार खेळाडू लियोनेल मेस्सी. रशिया येथे सुरू असलेला वर्ल्ड कप हा लियोनेल मेस्सीचा अखेरचा वर्ल्ड कप असणार आहे. त्यामुळे ‘अभी नही तो कभी नही’ या वाक्याला अनुसरूनच तो आपल्या संघसहकाऱ्यासह फुटबॉलच्या रणांगणात उतरेल यात शंका नाही. दिएगो मॅराडोनानंतरचा अर्जेंटिनाचा महान खेळाडू दबावाला झुगारून कशी कामगिरी करतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे.
आता जेतेपद हवेच
लियोनेल मेस्सी व ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यामध्ये सर्वोत्तम खेळाडूचा मान संपादन करण्यासाठी सातत्याने रेस लागलेली दिसते. यामध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोने पोर्तुगालला युरो तर रियाल माद्रिदला चॅम्पियन्स लीगचे जेतेपद मिळवून दिले आहे. त्यामुळे सध्या तरी पोर्तुगालच्या खेळाडूचे पारडे जड आहे. मात्र लियोनेल मेस्सीकडे वर्ल्ड कप जिंकून सर्व अपयश लीलया मागे टाकण्याची संधी आहे. यावेळी त्याला संघसहकाऱ्याकडून मोलाच्या मदतीची अपेक्षा आहे.
तीन लाख पन्नास हजार लोकसंख्या असलेला देश
आइसलॅण्ड हा ३ लाख ५० हजार लोकसंख्या असलेला देश. तरीही त्यांनी वर्ल्ड कपमध्ये झेप घेतलीय. ही अभिमानाची बाब. २०१६ सालातील युरो स्पर्धेत इंग्लंडला हरवून उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या या देशाने वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीत गटातून पहिले स्थान पटकावत आपली झंझावाती कामगिरी सुरूच ठेवली. यावेळी त्यांनी क्रोएशिया, युक्रेन व तुर्कीलाही मागे टाकले. आता उद्या अर्जेंटिनासारख्या बलाढय़ संघाला धक्का देण्यासाठी त्यांनी कंबर कसलीय.
मागील स्पर्धांमध्ये चमक, पण…
अर्जेंटिनाला मागील चारपैकी तीन कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम लढतीत हार सहन करावी लागलीय. तसेच २०१४ सालच्या वर्ल्ड कपमध्ये जर्मनीकडून जेतेपदाच्या लढतीत पराभूतही व्हावे लागले आहे. या सर्व स्पर्धांमध्ये त्यांनी शानदार खेळ केला होता, पण अखेरचा पंच देण्यात ते अपयशी ठरले होते. आता मेस्सी ऍण्ड कंपनी यामधून बाहेर येत आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाली असेलच.
आजच्या लढती
फ्रान्स वि. ऑस्ट्रेलिया, दुपारी ३.३० वाजता
अर्जेंटिना वि. आइसलॅण्ड, सायंकाळी ६.३० वाजता
पेरू वि. डेन्मार्क, रात्री ९.३० वाजता
क्रोएशिया वि. नायजेरिया, मध्यरात्री १२.३० वाजता






























































