
अल रय्यान, दि. 16 (वृत्तसंस्था) – फिफा वर्ल्ड कप स्पर्धेतील क्रोएशिया आणि मोरोक्को हे दोन अपराजित संघ सर्वप्रथम उपांत्य फेरीत हरले. त्याचबरोबर त्यांचे अंतिम सामन्यात धडक मारण्याचे स्वप्न उपांत्य सामन्यातच भंगले, पण आता हे दोन्ही संघ स्पर्धेतील आपला शेवट गोड करण्यासाठी तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत भिडणार आहेत. ते आता जगज्जेते होऊ शकत नाहीत, पण मायदेशी जाता-जाता त्यांना विजयाचे क्षण सोबत घ्यायचे आहेत.
वर्ल्ड कपच्या इतिहासात तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीला फारसे महत्त्व नसते, मात्र उद्याच्या लढतीला दोन्ही संघांनी गांभिर्याने घेतले आहे. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाचा सामनाही जोरदार होणार, यात तीळमात्र शंका उरलेली नाही.
मोरोक्को आपल्या आयुष्यासाठी लढत आहे. वर्ल्ड कप जिंकल्यास ते देशासाठी महान खेळाडू बनणार होते. आता त्यांना ते करणे शक्य नाही, पण ते तिसऱ्या क्रमांकासाठी झगडणार आहेत. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकासाठी दोन्ही संघ आपले सर्वस्व पणाला लावून खेळतील.
मोरोक्कोसाठी कतारचा वर्ल्ड कप संस्मरणीयच ठरला आहे. उपांत्य फेरीत धडक मारणारा मोरोक्को पहिलाच आफ्रिकन संघ ठरलाय. अंतिम फेरीत धडक मारण्याचे त्यांचे स्वप्न फ्रान्सने पूर्ण होऊ दिले नसले तरी त्यांचे समर्थक या कामगिरीनेही भारावले आहेत. त्यामुळे मोरोक्कोचे एन नसिरी, अमराबत, उनाही, झियेच, बुफल आणि हकिमी सारेच खेळाडू पुन्हा एकदा आपला सर्वोत्तम खेळ दाखवतील.
मोरोक्कोप्रमाणे क्रोएशियाचेसुद्धा स्वप्न उद्ध्वस्त झाले आहे. रशियातही त्यांचे जेते पद हुकले होते. मात्र यंदा तर ते उपांत्य फेरीतच हरले. त्यांचा संघ अर्जेंटिनाविरुद्धच्या पराभवाने अशरशः खचला आहे. लुका मोद्रिचसुद्धा उद्या आपल्या देशासाठी वर्ल्ड कपमधला शेवटचा सामना खेळणार आहे. मोद्रिचच्या कारकिर्दीला विजयासह निरोप द्यायचे ध्येय अख्ख्या क्रोएशियन टीमचे आहे. त्यामुळे क्रोएशियन संघ फक्त विजयासाठीच खेळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ ‘करो या मरो’ या स्थितीतच आहेत. विजयाचा ध्वज उंच धरण्यासाठी दोघेही उत्सुक आहेत. पण विजयाचा ध्वज फडकावण्यात कोण बाजी मारतो, ते उद्याच कळेल.
क्रोएशियाने 1998 साली आपल्या पदार्पणाच्या स्पर्धेतच तिसऱ्या क्रमांकाची लढत जिंकून आपल्या नावाची ओळख अवघ्या जगाला करून दिली होती. आता त्यांच्यासाठी तिसऱ्या क्रमांकाचाही सामना महत्त्वाचा आहे. तसेच मोरोक्को उपांत्य फेरी खेळणारा पहिला आफ्रिकन संघ होता आणि आता तिसरा क्रमांक पटकावणारा पहिला संघ म्हणूनही त्यांना मान मिळवायचा आहे. आजवर एकही आशियाई आणि आफ्रिकन देश ना फायनल खेळलाय ना तिसरा क्रमांक पटकावलाय. मोरोक्कोला तिसरा क्रमांक जिंकून नवा इतिहास रचायचाय.
दोघेही अपराजित अन् दोघेही उपांत्य पराभूत
फिफा वर्ल्ड कपमध्ये मोरोक्को आणि क्रोएशिया हे दोन्ही संघ अपराजित होते. मोरोक्कोने साखळीतील तीनपैकी दोन सामने जिंकले होते तर क्रोएशियाविरुद्धचा सामना गोलशून्य बरोबरीत संपला होता. त्यानंतर विजयाचा चौकार ठोकताना बेल्जियम, पॅनडा, स्पेन आणि पोतुर्गाल या संघांना हरवले होते. मात्र सहाव्या सामन्यात मोरोक्कोची विजयी घोडदौड फ्रान्सने रोखली. क्रोएशियानेसुद्धा पहिला सामना बरोबरीत सोडवल्यानंतर पॅनडाचा 4-1ने धुव्वा उडवला होता तर बेल्जियमविरुद्धची उपांत्य लढत त्यांनी गोलशून्य बरोबरीत सोडविल्यानंतरही ते बाद फेरीत पोहोचले होते. पण बाद फेरीतले दोन्ही सामने 1-1 अशा बरोबरीनंतर त्यांनी पेनल्टी शूटआऊटमध्ये जिंकले होते. आता हे दोन्ही संघ स्पर्धेत दुसऱ्यांदा आमनेसामने येत असून दोघांना विजय अनिवार्य आहे.
आजची लढत
क्रोएशिया-मोरोक्को – रात्री 8ः30 वा.




























































