FIFA World Cup – जर्मनी गॅसवरच, स्पेनला बरोबरीत रोखल्यामुळे आव्हान कायम

जपानविरुद्ध हार पचलेली नसतानाही जर्मनीला आणखी एक धक्का बसला. स्पेनविरुद्ध जर्मनीला विजय अनिवार्य होता, पण निकलास फुलूगने 83 व्या मिनिटाला केलेल्या गोलाने त्यांचे स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवले आहे. केवळ एका गुणावर असलेल्या जर्मनीला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी जर्मनीला कोस्टारिकाविरुद्ध केवळ विजयच मिळवायचा नाही तर जपानच्या पराभवावर अवलंबून राहावे लागणार आहे. येत्या शुक्रवारी आधी जर्मनी-कोस्टारिका लढत होईल आणि त्यानंतर स्पेन-जपानशी भिडेल.

काल रात्री उशिरा झालेल्या सामन्यात जर्मनीने स्पेनसमोर तगडे आव्हान उभे केले होते. स्पेनच्या गोलपोस्टवर आक्रमण करण्याचे डावही यशस्वी ठरले होते. 39 व्या मिनिटाला जर्मनीने आपल्या गोलाची नोंदही केली होती, पण ऑफसाइडच्या नव्या नियमाने त्यांचा गोल खेचून घेतला. त्यानंतर पहिला गोल करण्यासाठी दोन्ही एकमेकांवर तुटून पडले, पण पहिल्या सत्रात कुणालाही यश लाभले नाही.

हाफ टाइमनंतर स्पेन अधिक आक्रमक झाला आणि यॉर्डी अल्बाच्या वेगवान पासला अलवारो मोराताने गोलमध्ये बदलले आणि सामन्याचा पूर्ण माहोलच बदलला. मग जर्मनीने करो या मरो या भावनेने खेळ करीत 83 व्या निकालस फुलूगने स्पेनच्या गोलजाळय़ात आपला फटका मारला आणि सामना बरोबरीत आणला. बरोबरीनंतरही जोरदार खेळ झाला, पण दोन्ही संघ गोल करण्यात यश मिळवू शकले नाहीत. आजच्या बरोबरीमुळे जर्मनीचे आव्हान गॅसवर आहे.