दहशतवाद्यांविरुद्ध लढण्याचे शिक्षण शाळेपासूनच द्या! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

506

गुन्ह्यांच्या स्वरूपात आणि गुन्हेगारांमध्ये आज खूप बदल झाला आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी तपास यंत्रणेत सुधारणा करायला हव्यात. सिंगापूरसारख्या देशात प्रत्येक नागरिकाला पोलिसी प्रशिक्षण बंधनकारक आहे तर दुसरीकडे दहशतवादी कारवायांसाठी मुलांना वयाच्या 6-7 व्या वर्षापासून प्रशिक्षित केले जाते, हेदेखील समोर आले आहे. त्यामुळे अशा आव्हानांचा सामना करायचा असेल तर दहशतवादाविरोधात लढण्याचे प्रशिक्षण शाळेपासून द्यायला हवे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केले.

पोलीस मुख्यालयात राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांची अर्धवार्षिक परिषद संपन्न झाली. या परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुन्हेगारी नियंत्रणासंदर्भात मार्गदर्शन केले. पोलीस दलामध्ये ज्याप्रमाणे उच्च शिक्षित, तंत्रशिक्षित येत आहेत त्याचप्रमाणे गुन्हेगार, नक्षलवादीदेखील सुशिक्षित असल्याचे दिसून येते. यामुळे गुन्हेगारांच्या तंत्राचा, मानसिकतेचा अभ्यास करून गुन्हेगारीकर नियंत्रण आणण्यासाठी तपास पद्धतीत वारंवार सुधारणा करायला हव्यात, असे त्यांनी सांगितले.

ड्रोनचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करा – गृहमंत्री

जगभरात ड्रोन हल्ल्याच्या घटना घडत असल्याचे दिसून येते. हे एक नवीन आव्हान समोर आहे. याचा सामना करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करून कार्यान्वित करण्याची गरज असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. पोलीस खात्यामध्ये ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स’चा वापर कसा करता येईल याचाही विचार व्हावा. नवी मुंबईमध्ये महापे येथे ‘महाराष्ट्र सायबर’च्या मुख्यालयाच्या कामाला गती द्यावी, असेही त्यांनी सांगितले. या वेळीही गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज ऊर्फ बंटी पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी केले. कायदा व सुव्यवस्थेबाबत विविध विभागांच्या प्रमुखांनी सविस्तर सादरीकरण केले.

या वेळी मुख्य सचिव अजोय मेहता, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांच्यासह मुंबईचे पोलीस आयुक्त, पोलीस गृहनिर्माण, पोलीस कल्याण आदींचे महासंचालक, पोलीस महासंचालक कार्यालयातील विभागांचे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, राज्यातील शहरांचे पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक या वेळी उपस्थित होते.

पोलिसांनी सर्वसामान्यांच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण करावे!

पोलिसांनी निस्वार्थी, निस्पृहपणे काम करून त्यांच्याकडे येणाऱ्या सर्वसामान्यांच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. गुह्यामध्ये वेगवान तपास करून आश्वासक कामगिरी केली पाहिजे. राज्य पोलीस दलाला आवश्यक सायबर लॅब, फॉरेन्सिक लॅब, आधुनिक तपास सामग्री दिली जाईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. या वेळी ‘महाराष्ट्र सुरक्षित ठेवणारे शूरवीर’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचा गौरव केला. कोणतीही नवीन योजना प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या भरवशावर आणली जाते. योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी पोलीस दलाचे महत्त्वपूर्ण योगदान असते. पोलिसांच्या घरांचे प्रश्न मार्गी लावले जातील. विभागाला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.

पोलीस गृह प्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत – अजित पवार

पोलिसातील माणसाच्या मागे राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. पोलिसांसाठी मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकडे लक्ष देण्यात येईल. पोलीस गृह प्रकल्पांसाठी राज्य शासन आवश्यक ती तरतूद करेल. पोलीस गृह प्रकल्पाची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी हे सरकार प्रयत्नशील राहील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. वॉरंट बजावण्यासाठी जाताना तसेच गुन्हेगारांना ताब्यात घेऊन येताना पोलिसांना एसटीच्या साध्या बसचा प्रवास लागू आहे. मात्र वेगवान हालचालींची आवश्यकता लक्षात घेता ‘शिवनेरी’, आराम गाडय़ांतून पोलिसांना प्रवासाची मुभा मिळावी यासाठीही विचार केला जाईल, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या