नगर जिल्ह्यात पोलीस ठाण्याच्या दारातच हाणामारी

नगर तालुक्यातील पोलीस ठाण्याच्या दारातच सोमठाणे नलावडे येथील उपसरपंचांना सहा तरूणांनी मारहाण करण्याची घटना आज दुपारी घडली आहे. या संदर्भात पोलीस नाईक दत्तात्रय बडधे यांच्या फिर्यादीवरून पाच तरूणांसह दोन अनोळखी तरूणांवर सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच हाणामारी करणाऱ्या पाच तरूणांना ताब्यात घेतले आहे.

सोमठाणे नलावडे या गावात आज सकाळी गावचे उपसरपंच आकाश रामभाऊ दौन्डे यांना योगेश मधुकर दौन्डो याने मारहाण केली. सोमठाणे नलावडे गावातील ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव झाला असून हा ठराव केल्याने योगेश दौन्डे याने मारहाण केल्याचे आकाश दौन्डे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. आकाश दौन्डे हे उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात जात असतानाच पोलीस स्टेशनच्या दारातचं त्यांना योगेश दौन्डे, सतीश दौन्डे, संतोष दौन्डे, मनोज तुपविहीरे व दोन अनोळखी तरूणांनी मारहाण केली. स्टेशनच्या दारातच हाणामारी चालली असल्याचे पाहून पोलीस उपनिरीक्षक सचिन लीमकर, प्रदिप राजगुरू, पोलीस कर्मचारी कृष्णा बडे, भगवान सानप, अनिल बडे आदी कर्मचारी आले व त्यांनी पाच तरूणांना ताब्यात घेतले. तर दोन अनोळखी दोन तरूण पळून गेले. या संदर्भात पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी गोंधळ केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केला आहे.