चित्रपट अश्लील, पण त्यात लैंगिक दृश्ये स्पष्ट दिसत नाहीत! दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाविरोधात राज कुंद्रा हायकोर्टात

पॉर्न फिल्मची निर्मिती आणि मोबाईल अॅप द्वारे त्याचे प्रसारण केल्याप्रकरणी अटकेत असलेला व्यावसायिक राज कुंद्रा याला दंडाधिकारी न्यायालयाने 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. दंडाधिकारी न्यायालयाच्या या आदेशाविरोधात कुंद्रा याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून पोलिसांच्या कारवाईलाच आव्हान दिले आहे. निर्मिती केलेल्या चित्रपटाला अश्लील म्हणता येईल, पण त्यात लैंगिक दृश्ये स्पष्टपणे दिसत नाहीत असा दावाही कुंद्राने याचिकेत केला आहे.

पॉर्न फिल्मप्रकरणी राज कुंद्रा (45) याला मुंबई पोलिसांनी 19 जुलै रोजी अटक केली असून मॅजिस्ट्रेट कोर्टाने पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. मात्र सीआरपीसी कायद्याच्या कलम 41 ‘अ’नुसार पोलिसांनी अटक करण्यापूर्वी आपल्याला नोटिस बजावणे गरजेचे होते, पण नोटिस न पाठवताच अटक केल्याचा दावा करत कुंद्रा याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. फेब्रुवारी 2021 मध्ये याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी आरोपी म्हणून कोणीही आपले नाव नोंदवलेले नाही. एवढेच काय तर आरोपपत्र एप्रिल महिन्यात दाखल करण्यात आले असून त्यातील संबंधित आरोपी जामिनावर सध्या बाहेर आहेत असे कुंद्राने याचिकेत नमूद केले आहे.

पोलिसांनी अश्लील असल्याचा दावा केलेली सामग्री थेट स्पष्ट लैंगिक कृत्ये दर्शवत नाहीत, परंतु लघुपटाच्या स्वरूपातील या सामग्रीद्वारे एखाद्या व्यक्तीला उत्तम प्रकारे उत्तेजित केले जाऊ शकते. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम 67 ‘अ’ (लैंगिक सुस्पष्ट सामग्री प्रकाशित करणे) व कलम 67 (अश्लील सामग्री प्रकाशित करणे) ही कलमे पोलीस लादू शकत नाहीत असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या