
रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक 8 मधील मच्छीमार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. नाल्यात साचलेला कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या आणि सांडपाणी यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झाला आहे.
नगर परिषदेचा आरोग्य विभाग झोपेचं सोंग घेत आहे, अशी तीव्र टीका नागरिकांनी केली आहे. वारंवार लेखी आणि तोंडी मागण्या करूनही नगर परिषद प्रशासनाने या ठिकाणच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांचा संताप ओसंडून वाहत आहे.
या संदर्भात माजी नगरसेवक विकास पाटील यांनी नगर परिषद प्रशासनाकडे मच्छीमार्केट येथील पऱ्यांची स्वच्छता करण्याची मागणी केली. मात्र, नगर परिषदेने “मनुष्यबळ उपलब्ध नाही” असे सांगून ती मागणी थंडपणे फेटाळल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.