तरुणीने त्याच्या गळ्यावरील तीळ पाहिला आणि…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅनडामधील व्हॅन्कूव्हर येथे 23 ऑक्टोबर 2021 रोजी आईस हॉकीचा एक सामना सुरू होता. हा सामना पाहण्यासाठी डॉक्टरकीचं शिक्षण घेत असलेली नादिया पोपोविकी नावाची तरुणी आली होती. नादियाचं लक्ष मैदानातील एका व्यक्तीकडे गेलं होतं. त्या व्यक्तीच्या गळ्यावर असलेल्या तिळाने तिचं लक्ष वेधून घेतलं. तो तीळ पाहून नादिया हबकली होती.

पहिल्या नजरेतच नादियाला त्या व्यक्तीच्या गळ्यावर असलेला तीळ हा कॅन्सरचा असू शकतो असं वाटलं होतं. तिने ही गोष्ट कोणत्याही परिस्थितीत त्या माणसाला सांगायचीच असं ठरवलं होतं. काचेची भिंत असल्याने नादिया मैदानात जाऊ शकत नव्हती, यामुळे तिने मोबाईलवर एक मेसेज टाईप केला आणि खाणाखुणा करून त्या व्यक्तीला जवळ बोलावत तो मेसेज दाखवला.

हा मेसेज वाचल्यानंतर व्हॅन्कूव्हर कनूक्स संघाचा सहाय्यक व्यवस्थापक (साधने ) ब्रायन हॅमिल्टन हा अस्वस्थ झाला होता. त्याने सामन्यानंतर जाऊन चाचणी केली ज्यात त्याला कळालं की मैदानात तरुणीने त्याला जे सांगितलं होतं, ते खरं होतं.

आपल्याला कॅन्सर आहे हे एका नजरेत ओळखणारी ही तरुणी कोण होती हे ब्रायनला माहिती नव्हतं. त्याने सोशल मीडियाची मदत घेत या तरुणीचा शोध घ्यायला सुरुवात केली. अखेर त्याने नादियाला शोधून काढलं. या दोघांच्या भेटीचा व्हिडीओ व्हॅन्कूव्हर कनूक्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. ब्रायनला केलेल्या या मदतीबद्दल कृतज्ञता म्हणून नादियाला 10 हजार डॉलर्सची स्कॉलरशिप देण्याची घोषणा व्हॅन्कूव्हर कनूक्स संघाने केली आहे.