हुल्लडबाजी करणाऱ्य़ा भाजपच्या खासदार, आमदारांसह 11 जणांवर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूरात जुना पूना नाक्याजवळील संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ कार्यकर्ते जमवून हुल्लडबाजी व घोषणाबाजी केल्याप्रकरणी भाजपचे खासदार रणजित नाईक-निंबाळकर, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, तालुकाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यासह 11 जणांवर फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुना पूना नाका येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ दुपारच्या सुमारास माढय़ाचे भाजपचे खासदार रणजित नाईक-निंबाळकर, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, तालुकाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोटारगाडय़ा घेऊन येऊन ओबीसी आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करत होते.

दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख व समर्थकांनी आंदोलन केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर कारवाईही झाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी देशमुख यांना गावात येऊन आव्हान देण्याचा इशारा देत खरडपट्टी केली होती. याचा राग मनात धरून श्रीकांत देशमुख, खासदार निंबाळकर, आमदार कल्याण शेट्टी हे शेकडो समर्थकांसह बेकायदेशीर जमवाजमव, घोषणाबाजी करत होते. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.