खंडणी मागितल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या सरचिटणीसाविरोधात गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पारनेर

अतिक्रमण हटवण्यासाठी तब्बल 95 लाख रूपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पोपट माळी याच्यासह बाळासाहेब हिलाळ व दगडू केदारी यांच्याविरोधात खंडणी, जिवे मारण्याची धमकी देणे, शिविगाळ तसेच गावठी कट्ट्याचा धाक दाखविल्याप्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात जवळे कडलग तालुका संगमनेर येथील रोहिदास भास्कर देशमुख यांनी फिर्याद दिली आहे.

देशमुख यांची तालुक्यातील वनकुटे येथे गट नंबर 85 मध्ये 19 एकर जमीन आहे. 1 नोहेंबर 2018 रोजी वनकुटे येथील रहिवासी दगडू दुर्योधन केदारी, त्याचा मुलगा तसेच जामगाव येथील बाळासाहेब पोपट माळी यांनी देशमुख यांच्या शेतामध्ये बेकायदेशिररित्या टपरी आणून टाकली. टपरी का टाकली याबाबत बाळासाहेब माळी, दगडू केदारी व त्याच्या मुलाकडे देशमुख यांनी विचारणा केली असता दगडू केदारी व इतरांकडून जनरल मुखत्यारपत्र करून शेतजमीन घेतल्याचे बाळासाहेब माळी व बाळासाहेब हिलाळ यांनी सांगितले. प्रांताधिकाऱ्यांकडील निकाल तुमच्या विरोधात गेला आहे. तुम्हाला या क्षेत्रात वहिवाट करण्याचा कोणताही अधिकार राहिलेला नाही असेही सांगण्यात आले. प्रांताधिकाऱ्यांच्या निकालास आपण अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे स्थगिती मिळविली असल्याचे देशमुखी यांनी माळी, हिलाळ तसेच केदारी यांना सांगितले. मात्र त्यानंतर 22 नोहेंबर रोजी देशमुख यांनी बाळासाहेब माळी, दगडू केदारी तसेच बाळू हिलाळ यांच्याशी चर्चा केली असता एकरी 5 लाख याप्रमाणे 19 एकरची तब्बल 95 लाख रूपयांची खंडणी मागण्यात आली. पैसे न दिल्यास परिणाम वाईट होतील. तुम्हाला शेतात येऊ देणार नाही. जर शेतात आले तर तुमचे हात पाय मोडून टाकू अशी धमकीही देण्यात आली. 30 ते 40 गुंड सोबत आणून देशमुख व त्यांच्या शेतामधील मजुरांना धक्काबुक्की करीत शेतातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न करण्यात आला.

2 डिसेंबर रोजी देशमुख शेतावर गेले असता तेथे 7 ते 8 महिला तसेच 20 ते 21 गुंड दोन बोलेरो गाड्यांमधून आले. तेथील देशमुख यांच्या राहत्या घरातून त्यांना हुसकावून लावण्यात आले. आम्हाला पैसे न दिल्यास डाळींबाचे पीक उद्ध्वस्त करण्याची धमकी देण्यात आली. 2 डिसेंबर रोजी 50 ते 60 माणसांना आणून शेतातील डाळींबाची फळे बेकायदेशिपणे तोडण्यात आली. त्यांना विचारणा करण्यात आली असता तू हायकोर्टातून स्टे आण अथवा कोठूनही आण आम्ही कायद्याला जुमानत नाही.पोलिस डिपार्टमेंट आम्ही खिशात घेउन फिरतो. मी स्वतः इंटरनॅशनल पोलिस आहे. स्थानिक पोलिसांना जुमानत नाही. जर येथे कोणी आले तर सर्वांचे खुन करून टाकतो. गावठी कट्टा रोखून 19 एकरवरील अंदाजे 15 ते 20 लाख रूपयांचे डाळींब तोडून ते विना क्रमांकाच्या वाहनातून नेण्यात आले.

पोलिस ठाण्याच्या आवारातही धमक्या
देशमुख हे पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता काही गुंडांनी त्यांना बाहेरच बसून ठेवले. फिर्याद दिली तर मारून टाकू अशी धमकी दिल्याने देशमुख तेथून निघून गेले. त्यानंतर हिंमत करून 1 फेब्रुवारी रोजी देशमुख यांनी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली.