
घोडबंदर रोडवरील सिनेवंडर मॉलच्या बाजूच्या असलेल्या ओरियन बिझनेस पार्क इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आज रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग इतकी मोठी होती की मॉलला देखील आगीची झळ बसली. ग्राहकांना तातडीने बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू होते.
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलानेही तत्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम हाती घेतले. या आगीमुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. आगीची तीव्रता अधिक असल्याने आग विझवण्यासाठी वेळ लागत होता. जवळ असलेल्या पाचव्या मजल्यापर्यंत या आगीचे लोळ गेल्याचे दिसून आले. मुख्य रस्त्याच्या जवळच ही इमारत असल्याने या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
ब्लड बँक सुरक्षित
ओरियन बिझनेस पार्कमध्ये ब्लड बँक देखील असून ती सुरक्षित असल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले. या ब्लड बँकेमध्ये दर आठवडयाला लहान मुलांना रक्त देण्याचे काम चालते मात्र ही सर्वसामग्री सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.




























































