
कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयासमोर नरवडे रोड येथे साबिया गॅरेजला भीषण आग लागली असून या आगीची झळ बाजूला असलेल्या एका हॉटेललाही बसली आहे. शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कणकवलीच्या नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाने आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. गॅरेजच्या बाजूलाच 20 ते 25 स्टॉल असून आग पसरली असती तर मोठी दुर्घटना घडल्याची शक्यता होती.
उपजिल्हा रुग्णालयासमोरील साबिया ऑटो गॅरेजच्या मागील बाजूस पेटवलेल्या शेकोटीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. गॅरेजमधे ज्वलनशील ऑईलसह इतर सामान असल्याने आगीने थोड्याच वेळात रौद्ररुप धारण केले. आगीत गॅरेजमधील अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. गॅरेजजवळ असलेल्या हॉटेल सदगुरूला आगीची झळ बसली. मात्र, अग्निशामक दलाने आग विझवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.


























































