
आगीचा भडका उडणाऱ्य़ा ठिकाणावर तातडीने नियंत्रण मिळवून आग विझवणारा फायर बॉल पालिका मुख्यालय इमारतीत ठिकठिकाणी लावण्यात आला आहे. आगीच्या स्पॉटवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाने फायर बॉलचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. आगीच्या उमगस्थानावर बॉल टाकल्यास तो बॉल फुटून त्यात असलेल्या रसयानांमुळे फेस तयार होतो. या फेसमुळे आगीचा ऑक्सिजनशी संपर्क खंडित होऊन आग विझते. अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी ही माहिती दिली.
मुंबईत दररोज सरासरी आग लागल्याचे 10 कॉल आपत्कालीन विभाग, अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात येत असतात. आग छोटी असली तरी वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर आगीचा भडका उडू शकतो. परंतु छोटय़ा आगीवर वेळीच नियंत्रण मिळवता यावे यासाठी हे फायर बॉल उपयुक्त ठरू शकतात. आग विझवण्यासाठी रेती आणि फायर एक्सटिंग्यूशरपेक्षा फायर बॉल वापरण्यास अधिक सोपे आहे.
आगीच्या दुर्घटनेची तीव्रता कमी होणार
लांबूनही हा बॉल आगीच्या दिशेने फेकता येतो. अनेक वेळा फायर एक्सटिंग्यूशरचा नॉब काढणे सामान्य नागरिकांना जमत नाही. अशा परिस्थितीत आग विझवण्यास हा बॉल वापरणे सहज शक्य आहे.
या प्लॅस्टिकच्या बॉलमध्ये सोडियम बाय कार्बोनेट, पोटॅशियम बायकार्बोनेट ही दोन प्रमुख रसायने असतात. रसायने आर्द्रतेमुळे ओली होऊ नये म्हणून इतर काही रसायनेही असतात. खेळण्यातील बॉलप्रमाणे असणारा बॉल आगीवर टाकल्यास बॉल फुटून त्यातून रसायनांचा फेस निर्माण होता. या फेसमुळे ऑक्सिजनशी संपर्प तुटून आग विझते. साधारण 60 अंश सेल्सिअस तापमानाला हा बॉल फुटतो.

























































