अग्निशमन दल प्रमुखपदावरून शशिकांत काळे यांना हटवले, कैलाश हिवराळे यांची नियुक्ती

मुंबई अग्निशमन दलप्रमुख शशिकांत काळे यांना आज पदावरून हटवण्यात आले आहे. काळे यांनी ‘राष्ट्रपती पदक’ पुरस्कारासाठी करण्यात आलेल्या शिफारशीत राज्य आणि केंद्र सरकारकडे प्रशासनाची दिशाभूल करणारी माहिती पुरवल्याचा प्रकार समोर आल्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी प्रभारी अग्निशमन दल प्रमुख म्हणून कैलाश हिवराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन दल अधिकारी प्रभात रहांगदळे यांना उपायुक्त पदी बढती मिळाल्याने ऑगस्ट 2020 मध्ये शशिकांत काळे यांच्यावर अग्निशमन दलाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र काळे यांनी राष्ट्रपती पुरस्कारासाठी राज्य व केंद्र सरकारकडे दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याचे समोर आले आहे. या गंभीर प्रकारामुळे काळे यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. त्यामुळे त्यांची सह आयुक्त सामान्य (प्रशासन) मिलीन सावंत यांच्या मार्फत खात्यांतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे काळे यांची खात्यांतर्गत चौकशी होईपर्यंत त्यांना अग्निशमन दल प्रमुख पदावरून हटवण्यात आले असून त्यांचे अधिकारही काढून घेण्यात आले आहेत.

हिवराळे यांच्यावर जबाबदारी

मुंबई अग्निशमन दल प्रमुखपदी नियुक्ती झालेले कैलाश हिवराळे हे गेली 32 वर्षे अग्निशमन दलात कार्यरत आहेत. हिवराळे हे परिमंडळ-2 चे उपप्रमुख अग्निशमन अधिकारी आहेत. हा पदभार सांभाळून प्रभारी प्रमुख अग्निशमन अधिकारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या