
कळमनुरी शहरातील गुजरी बाजार भागामध्ये महाराणा प्रताप चौकात अचानक आग लागून एक किराणा दुकान व टेलरिंग दुकान जळून खाक झाले. या आगीत 7 लाख रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर घडली. कळमनुरी शहरातील गुजरी बाजार भागात दिलीप उर्फ प्रफुल्ल साकळे यांचे किराणा दुकान आहे. शुक्रवारी मध्यरात्री दुकानात अचानक आग लागली. यामध्ये किराणा माल, साहित्यासह फर्निचर जळून खाक झाले. तसेच शेजारील टेलरिंगचे दुकानही जळाले. नागरिकांनी तसेच पोलीस प्रशासनाने अग्निशामक दलाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे, पोलीस कर्मचारी शिवाजी पवार, चाटसे, घोगरे, राठोड, अग्निशामक दलाचे त्र्यंबक जाधव, महावितरणचे मेंडके नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे व अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. या आगीचे ठोस कारण अद्याप समोर आले नाही.

































































