नाशिकच्या लोणजाई डोंगरावरील 1500 वृक्ष जळून खाक

प्रातिनिधीक फोटो

नाशिकच्या निफाड तालुक्यातील लोणजाई डोंगरावर अज्ञातांनी लावलेल्या आगीत सुमारे 1500 झाडे जळून खाक झाली. याबाबत लासलगाव पोलीस ठाण्यात अकस्मात जळिताची नोंद करण्यात आली आहे.

निफाड तालुक्यातील विंचूरजवळील सुभाषनगर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत लोणजाई माता मंदिर डोंगर परिसरात शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड उपक्रमांतर्गत विविध फळ झाडांची लागवड करण्यात आली होती. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास अचानक त्या डोंगरावरील झाडांना आग लागली. शेतमजूर चंद्रकांत लांडबले यांनी याबाबत पंचायत समिती सदस्य संजय नंदुकांत शेवाळे यांना माहिती दिली. इतर मजूर व सदस्यांच्या सहाय्याने त्यांनी आग विझविली. मात्र, तोपर्यंत डोंगरावरील सुमारे 1500 झाडे जळून खाक झाली होती. डोंगरावरील परिसरात नेहमीच शांतता असते. तेथे काहीजण फिरण्यासाठी जातात. बीडी, सिगारेट पडल्यामुळे गवत पेटून ही आग लागल्याची शक्यता ग्रामस्थ व पोलिसांनी वर्तविली आहे. याप्रकरणी लासलगाव पोलिसांनी अकस्मात जळिताची नोंद घेतली असून, पोलीस नाईक योगेश शिंदे पुढील तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या