परभणीत फर्निचरच्या शोरुमला आग; साहित्य जळून खाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परभणीतील जिंतूर रोडवरील न्यू इंडिया फर्निचरच्या शोरुमला आग लागल्याची घटना रविवारी पहाटे घडली. आग इतकी भीषण होती की, या घटनेत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. पहाटे मॉर्निंग-वॉकसाठी आलेल्या नागरिकांना ही आग दिसली. त्यानंतर अग्निशमन दलाने दीड तासाच्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पंचनामा झाल्यानंतर आगीत किमान 10 ते 15 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जिंतूर रस्त्यावरील विसावा कॉर्नरवरील इंडिया फर्निचर या शोरूमला पहाटे साडेतीन वाजता अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केले. यामध्ये दुकानातील सोफा सेट, लाकडी कपाट आणि इतर प्लास्टिकच्या वस्तूंनी पेट घेतला. यामध्ये सर्व साहित्य जळून खाक झाले. पहाटे साडे चार वाजता मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांना ही बाब लक्षात आल्याने त्यापैकी काहींनी अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी दीड तासात आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल तसेच पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले.