मुंबईतील अग्निसुरक्षा वाऱ्यावर! हायकोर्टात याचिका; 7 फेब्रुवारीला सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ताडदेव येथील कमला इमारतीला लागलेल्या आगीत 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अग्निसुरक्षा वाऱयावर असल्याचा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्य सरकारने अग्निसुरक्षेसंदर्भात 2009 साली प्रारूप अधिसूचना जाहीर केली, मात्र अंतिम अधिसूचना काढलीच नाही तसेच आगीच्या घटना वारंवार घडत असून या दुर्घटना घडू नयेत म्हणून सरकारने ठोस पावले उचलली नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. न्यायालयाने याचिकेची दखल घेत त्यावर 7 फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली आहे.

करी रोड येथील अविघ्न पार्क येथील टॉवर आणि ताडदेवच्या कमला इमारतीला आग लागण्याच्या घटना मागील दोन महिन्यांत घडल्या असून या घटनांमध्ये निष्पाप नागरिकांचे बळी गेले. ‘26/11’च्या हल्ल्यानंतर राज्याच्या नगरविकास विभागाने अग्निसुरक्षेसंदर्भात 27 फेब्रुवारी 2009 साली प्रारूप अधिसूचना जाहीर केली. मात्र अनेक वर्षे उलटूनही यासंदर्भात अंतिम अधिसूचना अजून काढलेली नाही. याविरोधात ऍड. आभा सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. आदित्य प्रताप यांनी सर्व प्राधिकरणाला या नियमांचे पालन करण्याचे न्यायालयाने आदेश द्यावेत, अशी मागणी केली. न्यायालयाने या याचिकेची दखल घेत सुनावणी 7 फेब्रुवारी रोजी ठेवली.