शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक

सामना प्रतिनिधी । लातूर

शाळेचा पहिला दिवस… गावात हलगीचा नाद घुमू लागला. त्यापाठोपाठ बैलगाडीतून मिरवणूक निघाली, पण ही मिरवणुक कोण्या राजकीय नेत्याची नव्हती तर पहिल्याच दिवशी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सजवलेल्या बैलगाडीतून वाजत-गाजत शाळेत नेण्यात येत होते. शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांच्या स्वागताला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके हजर होते. या उपक्रमाबद्दल जिल्हा परिषद उपाध्यक्षांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अधिक संख्येने विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत यासाठी विविध उपक्रम योजण्यात येत आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी आनंदात दिसत होते. गणवेश घालून पाठीवर दप्तर अडकवलेले विद्यार्थी घराच्या दारात उभे होते. त्यावेळी सजवलेली बैलगाडी त्यांच्या दारात आली. विद्यार्थ्यांना बैलगाडीत बसवण्यात आले आणि हलगीच्या गजरात बैलगाडीतून मिरवणुकीद्वारे हे विद्यार्थी हरंगुळ येथील नव्या वसाहतीत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पोहोचले. विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. शाळेत प्रवेश घेताच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात आली, तसेच वृक्षारोपणही करण्यात आले.

जि.प.उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी ४ तालुक्यातील ११ शाळांना भेटी दिल्या. लातूरच्या शासकीय वसाहतीतील जि.प.कन्या प्रशाला व प्राथमिक शाळा, हरंगुळच्या नव्या वसाहतीतील प्रा. शाळा, चाकुर तालुक्यातील आटोळा येथील केंद्रीय प्राथमिक शाळा, बोळेगाव येथील जि.प.शाळा आणि धामनगावच्या प्राथमिक शाळेला त्यांनी भेट दिली. शिरुर अनंतपाळ तालुक्यातील कारेवाडी, सुमठाणा, तसेच उदगीर तालुक्यातील सताळा व डिगोळ येथील प्राथमिक शाळांमध्येही तिरुके यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून विद्यार्थी व पालकासह शिक्षकांना मार्गदर्शन केले.

आपली प्रतिक्रिया द्या