
गेल्या २० वर्षांत यंदा प्रथमच अमेरिकेत डासांपासून माणसांमध्ये मलेरियाचा प्रसार झाला आहे, असा इशारा अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (CDC) दिला आहे. फ्लोरिडामध्ये गेल्या दोन महिन्यात प्लाझ्मोडिअम व्हायवॅक्स मलेरियाची चार प्रकाराने नोंदविली गेली. शिवाय टेक्सासमध्येही एक प्रकरण आढळले आहे. उपचारानंतर सर्व रुग्णांमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले. (CDC) कडून अमेरिकेत मलेरिया होण्याचा धोका खूपच कमी आहे असा दावाही करण्यात आला.
कोविडपूर्वी अमेरिकेत दरवर्षी मलेरियाची सुमारे २००० प्रकाराने नोंदवली गेली होती. पण ही लागण बाहेरील प्रवाशांकडून झाली असल्याचा दावा अमेरिकेकडून केला गेला होता. आणि या संसर्गामुळे वर्षाला ५ ते १० जणांचा मृत्यू नोंदविला गेला होता. येथे शेवटचा मलेरियाचा प्रसार २००३ साली झाला होता. आणि त्यात ८ प्रकरणे आढळली होती.
मलेरियाची लक्षणे कोणती?
थंडी वाजून ताप येणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे, थकवा, मळमळ, उलट्या आणि अतिसार या लक्षणांचा समावेश असू शकतो. सामान्यत: संसर्ग झाल्यानंतर लक्षणे 10 दिवस ते चार आठवड्यांच्या दरम्यान सुरू होतात, कधी ती एक वर्षानंतरही दिसू शकतात.
मलेरियाचा प्रसार कसा होतो?
जगातील 240 दशलक्ष वार्षिक प्रकरणांपैकी बहुतेक प्रकरणे संक्रमित मादी डासांच्या चावण्यामुळे पसरतात. क्वचित प्रसंगी, हा आजार आईकडून तिच्या न जन्मलेल्या बाळाला, रक्त संक्रमणाद्वारे किंवा इंजेक्शन द्वारे देखील होऊ शकतो.
उपचार कसा केला जातो?
CDC म्हणते की मलेरियाचा संशय असलेल्या रुग्णांना रक्त तपासणी आणि जलद निदान चाचण्या उपलब्ध असतील तेथे कराव्यात. उपचारामध्ये क्लोरोक्विन किंवा अॅटोव्हाक्वोन आणि प्रोगुअनिल यांसारखी मलेरियाविरोधी औषधे घेणे अपेक्षित आहे.
मलेरियावर उपचार न झाल्यास काय होते?
उपचार न झाल्यास, मलेरिया एक जीवघेणा आजार बनू शकतो, ज्यामुळे मूत्रपिंड निकामी होणे, तीव्र श्वसनाचा त्रास , कोमा आणि संभाव्य मृत्यू होऊ शकतो.
मलेरियापासून बचाव कसा कराल ?
मलेरियापासून स्वतःचे संरक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे डास चावण्यापासून बचाव करणे. CDC ने पर्यावरण संरक्षण केंद्राकडे नोंदणीकृत कीटकनाशक वापरण्याची शिफारस केली आहे , लांब-बाह्यांचे , पूर्ण अंग झाकणारे कपडे घालावे, खिडक्या आणि दारांवर डासांसाठी जाळी बसवावी. दोन दिवसांपेक्षा जास्त पाणी साठवून ठेवू नये.






























































