
‘बालरंगभूमी अभियान, मुंबई’ या संस्थेतर्फे येत्या 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी बेळगावमध्ये पहिल्या बालनाटय़ संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ रंगकर्मी, नाटककार मीना नाईक संमेलनाध्यक्ष आहेत. संत मीरा हायस्कूलमध्ये होणाऱया संमेलनाला अभिनेते सुबोध भावे, प्रसाद पंडित, अभिनेत्री सई लोकूर यांची प्रमुख उपस्थिती असेल.
‘अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद शाखा बेळगाव’ आणि ‘फुलोरा बेळगाव’ या संस्थांचे सहकार्य संमेलनाला लाभले आहे. संमेलनासाठी बेळगावमधील 25 ते 30 शाळांमधील प्रत्येकी 15 मुले याप्रमाणे एकूण 300 मुलांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती बालरंगभूमी अभियान, मुंबईच्या अध्यक्षा वीणा लोकूर यांनी दिली.
18 फेब्रुवारी रोजी दुपारी नाटय़ दिंडीने संमेलनाचे उद्घाटन सई लोकूर हिच्या हस्ते येईल. त्यानंतर बेळगावच्या कलाकारांचा सहभाग असलेली दोन बालनाटय़े शिबिरार्थींसाठी सादर करण्यात येतील. 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 1 या वेळेत बालरंगभूमी अभियानासाठी काम करणारे, मुंबई-पुण्यातील तज्ञ तीनशे मुलांसाठी अभिनयाची कार्यशाळा घेतील. त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेतून येणाऱया शिक्षक आणि पालकांसाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारच्या सत्रासाठी महाराष्ट्रातून राज्य नाटय़ स्पर्धेला बक्षीस मिळवलेल्या तीन नाटकांचे प्रयोग सादर करण्यात येणार आहेत.
बेळगावसारख्या ठिकाणी मराठी भाषेचे संवर्धन व्हावे आणि ती तिथे टिकावी यासाठी इथल्या अनेक संस्था प्रयत्न करीत असतात. बेळगावची नाटय़संस्कृती जपण्यासाठी, तिथल्या मुलमध्ये अभिनयाची आवड निर्माण व्हावी, यासाठी
बालरंगभूमी अभिमान संस्था प्रयत्नशील आहे.



























































