जय हिंद! ‘चांद्रयान’ने काढलेला चंद्राचा ऐतिहासिक फोटो इस्त्रोने केला प्रसिद्ध

11403

हिंदुस्थानच्या अवकाश मोहिमांमधील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘चांद्रयान 2’ टीपलेला चंद्राचा पहिला फोटो भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्त्रो)ने प्रसिद्ध केला आहे. चंद्राच्या पृष्ठभागापासून सुमारे 2650 किलोमीटर अंतरावरून हा फोटो घेण्यात आला आहे. ‘चांद्रयान 2’ने विक्रम रोव्हरच्या मदतीने 21 ऑगस्ट 2019 रोजी हा फोटो घेतला आहे. यात चंद्रावरील अपोलो खड्डे स्पष्ट दिसत आहेत.

याआधी इस्रोच्या चांद्रयान-2ने 21 ऑगस्टला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश केला. चांद्रयान-2ने 29 दिवसांचा प्रवास पूर्ण करत ही मोठी कामगिरी फत्ते केली. त्यामुळे आता 7 सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण भागावर उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

चांद्रयानचा पुढचा प्रवास असा असेल
चांद्रयान 20 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान चंद्राच्या आणखी चार कक्षा पार करत त्याच्याजवळ जाईल. या चार कक्षेतून जाताना यानाला प्रत्येक वेळी आपली गती बदलावी लागणार आहे. चांद्रयान ज्यावेळी चौथी कक्षा पार करेल त्यावेळी तो चंद्राच्या 100 किलोमीटर इतका जवळ असेल. त्यानंतर विक्रम लँडर आणि रोवर प्रज्ञान यानापासून वेगळे होतील. 2 सप्टेंबरला ही गोष्ट घडेल. चंद्रावर उतरण्याआधी चार दिवस सतत लँडर विक्रम चंद्राच्या पृष्ठभागाची माहिती घेत राहील आणि उतरण्यासाठी योग्य जमिनीची निवड करेल. त्यानंतर 6 ते 8 सप्टेंबरला चंद्रावर प्रत्यक्ष उतरण्याची प्रक्रिया सुरू होईल. इस्रोच्या मुख्यालयातून 7 सप्टेंबरला लँडरची गती आणि दिशा सुधारण्यासाठी दोन कमांड दिली जाईल आणि चंद्राच्या दक्षिण भागात चांद्रयान उतरेल आणि अवकाश संशोधन क्षेत्रात विक्रम रचेल.

परिभ्रमण कक्षेचे महत्त्व
कोणत्याही ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करताना त्याच्या कक्षेतील गतीप्रमाणेच प्रवेश करावा लागतो. चंद्राच्या कक्षेतही एका निश्चित गतीने चांद्रयानाने प्रवेश केला. ही गती जास्त असती तर चांद्रयान चंद्राच्या परिभ्रमण कक्षेपासून बाहेर फेकले गेले असते आणि अथांग अवकाशात हरवले असते. जर चांद्रयानाची गती ही चंद्राच्या परिभ्रमण कक्षेपेक्षा कमी असती तर त्याला चंद्राने गुरुत्वाकर्षणाने स्वतःकडे खेचून नष्ट केले असते.

‘ती’ 15 मिनिटे महत्त्वाची
चंद्रावर उतरण्यापूर्वीची 15 मिनिटे अत्यंत महत्त्वाची असणार आहेत. चंद्रावर उतरण्यासाठी अवघ्या 30 किलोमीटरवर असलेल्या यानाची गती आणखी कमी केली जाईल. विक्रम रोव्हरचे चंद्रावर उतरण्याचे काम सगळय़ात आव्हानात्मक आहे. सॉफ्ट लँडिंग करत विक्रम चंद्रावर उतरणार आहे. या आधी अमेरिका, चीन आणि रशियाने सॉफ्ट लँडिंग करत चंद्रावर उतरण्याचा कारनामा केला आहे. त्यानंतर अशा प्रकारे सॉफ्ट लँडिंग करणारा हिंदुस्थान हा चौथा देश बनणार आहे.

चांद्रमोहिमेची वैशिष्टय़े
चंद्रावर उतरवल्यावर 6 चाकांचा प्रज्ञान रोवर विक्रम लँडरवरून वेगळा होईल. त्यासाठी चार तासांचा अवधी लागेल. प्रज्ञान एक सेंटीमीटर प्रतिसेकंदाने विक्रमपासून बाहेर पडेल. 14 दिवस म्हणजे चंद्रावरील एक दिवस असतो. प्रज्ञान चंद्रावर एकूण 500 मीटर चालेल. चंद्रावरील खनिजांचा शोध घेईल. प्रज्ञान चंद्राची छायाचित्रे घेऊन ती विक्रम रोव्हरच्या माध्यमातून ही छायाचित्रे इस्रोकडे पाठवेल.

‘त्या’ ऐतिहासिक क्षणी ‘इस्रो’त पंतप्रधान उपस्थित राहणार
7 सप्टेंबरला चांद्रयान-2 चंद्रावर उतरणार आहे. या ऐतिहासिक दिवसाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी आणि इस्रोच्या संशोधकांचे कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी खुद्द इस्रोमध्ये उपस्थित राहणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या