अनुबंध; पहिला पाऊस

>>लता गुठे

लहानपणी नगरमधला मनात अलगद रुजलेला पाऊस मुंबईसारख्या महानगरात घेऊन आले आणि सिमेंटच्या जंगलात त्याला अनुभवू लागले. तेव्हा इथे भेटणारा पाऊस, माझ्या गावाच्या आठवणी सांगणारा पाऊस भेटल्याचा आनंद होतो. मला इथे भेटला तेव्हा तो कवितेतून प्रकट होऊ लागला.

पावसाचं आणि माझं नातं तसं आजकालचं नाही, तर पूर्वापार चालत आलेलं आहे असं मला नेहमीच वाटतं. कारण माझा जन्मही पावसाळ्यातला असल्यामुळे पावसासोबतच मी जन्माला आले. त्यामुळे की काय माहीत नाही, पाऊस माझ्या मनात रुजला आणि लिहायला लागल्यावर तो कवितेतून पाझरला. मी ग्रामीण भागात लहानाची मोठी झाले. त्यामुळे पावसाचे अनेक विभ्रम मी कळत नकळत अनुभवले. उघडय़ा शेतातून झिम्माडत येणारा काळ्यासावळ्या रंगाचा, हळव्या अंगाचा पाऊस मी अनुभवला. नगर जिह्यातील काही भागात कायमच दुष्काळ असल्यामुळे तिथे राहणाऱया लोकांना पावसाचं नेहमीच अप्रूप वाटतं तसा मलाही वाटतं. दूरवरून रेंगाळत येणारा पाऊस पाहून आनंद व्हायचा.

पिकात धुडगूस घालणारा पाऊस, त्याचा आवेग, शाळेच्या पत्र्यावर तडतडत पाय वाजवत येणारा पाऊस, त्याचा नाद, माळरानावर गवतफुलांचे पैंजण बांधून माझ्या सुरावर नाचणारा पाऊस, त्याची लय असे पावसाचे रंगरूप अनुभवायला मिळाले. पहाटे पाऊस येऊन गेला की, सकाळी गवताच्या पात्यांवरून ओघळणारे शुभ्र थेंब कोवळ्या उन्हात मोत्यासारखे चमकायचे आणि ते लहानशा तळहातावर घेताना जो आनंद मिळायचा तो शब्दातून नाही व्यक्त करता येणार. लहानपणापासून मनात अलगद रुजलेला पाऊस आणि तो पाऊस मी मुंबईसारख्या महानगरात घेऊन आले आणि सिमेंटच्या जंगलात त्याला अनुभवू लागले तेव्हा इथे भेटणारा पाऊस, माझ्या गावाच्या आठवणी सांगणारा पाऊस भेटल्याचा आनंद होतो आणि सहजच कवितेच्या ओळी कागदावर उतरतात…

ऋतू आले खेटून गेले
ना दुसरा मनात रुजला
पुन्हा भेटण्याचे वचन देऊन
पाऊस काळीज घेऊन गेला’

काळीज घेऊन जाणारा पाऊस आता हरवल्यासारखा वाटतो. मागील आठवडय़ात नुकतीच गावी जाऊन आले. उन्हाच्या काहिलीने तप्त झालेली भेगाळलेली जमीन पाहून मन सैरभैर झालं. वैशाखातल्या उन्हाने तापलेली जमीन टाहो फोडताना पाहिली की, आपोआपच नजर आभाळाला खिळते याचा प्रत्यक्ष अनुभव आला. धरतीची उदास अवस्था पाहून कधी त्याला ठरलेल्या वेळेच्या आधीच यावं लागतं. त्या वेळेला वादळवाऱयासह गारपीट करत तो येऊन जातो. कसाही आला तरी धरती त्याचं स्वागतच करते. त्याच्या आगमनाने दरवळू लागते. पुन्हा तो दडी मारतो, पुन्हा ती विरहिणी त्याची प्रतीक्षा करू लागते.
तेव्हा ती मला कृष्णाच्या राधेसारखी भासू लागते आणि विचार करता करता मीही त्यांच्याशी एकरूप होऊ लागते तेव्हा कधीतरी लिहिलेल्या माझ्या कवितेतील ओळी आठवतात… धरतीची लेक राधा आहे

राधेचं रूप माझ्यात आहे
म्हणूनच तिघींचीही व्यथा एकच आहे

असं वाटू लागतं. कारण तिघींचीही विरहाची अवस्था सारखीच असते. नक्षत्र बदलताच मग हळूहळू आकाशात काळे ढग जमू लागतात. प्रथम बदललेला वारा पाऊस येण्याची चाहूल देतो आणि झाडाच्या फांदीवर लपून पावशा पावसाचे आलाप छेडू लागतो. त्याच्या सुरावलीतील आर्तता नभाच्या काळजाला भिडते आणि मग पंख फुलवून काळे ढग सूर्याला लपवतात. ढगांचे ढोलताशे वाजू लागतात. नभाचा ऊर चिरत विजा चमचमू लागतात. ते पाहून मंगेश पाडगावकरांच्या कवितेतील ओळी ओठांवर रेंगाळत येतात.

मधुनीच वीज थरथरते
क्षण प्राण उजळुनी विरते
करी अधिक गहन अंधारा रे
बाहेर बरसती धारा रे

पाऊस येण्याचे चिन्ह जाणवू लागताच चराचरांत बदल जाणवू लागतात. आठ महिने प्रियकराची प्रतीक्षा करत असलेल्या धरतीचा रोमरोम शहारू लागतो आणि त्यांचा मीलन सोहळा सुरू होतो. तेव्हा धरती मला सती पार्वतीसारखी भासू लागते.

सती पार्वती सृष्टी ही पाऊस शंकर भोळा
डोळे भरूनी मीही पाहते त्यांचा मीलन सोहळा
असे शब्दही त्या सोहळ्यामध्ये कवितेच्या रूपातून साकार होतात आणि तो सोहळा शब्दांच्या चिमटीत पकडता येतो तेव्हा आनंदाला उधाण येते.

असा पहिला पाऊस प्रथम भेटतो तेव्हा कवी- कवयित्रींच्या शब्दांनाही अंकुर फुटू लागतात आणि त्या पावसाच्या कविता होऊन कोऱ्या कागदावर बरसू लागतात. शांताबाई एका कवितेत म्हणतात.

आला पाऊस मातीच्या वासांत गं
मोती गुंफीत मोकळ्या केसांत गं
आभाळात आले, काळे काळे ढग
धारा कोसळल्या, निवे तगमग
धुंद दरवळ, धरणीच्या श्वासात गं

हा पहिला पाऊस जेव्हा आपल्याकडे छत्री नसते तेव्हाच अवेळी कुठेतरी आपल्याला गाठतोच आणि त्रेधातिरपीट उडवून देतो. त्याचा तो झालेला स्पर्श अनेक आठवणी जाग्या करतो आणि तो देहधारी वाटू लागतो तेव्हा आपसूकच अंतरी दडलेली गुपितं व्यक्त होऊ लागतात.

रस्त्यामध्ये भेटतो अवेळी,
भर दुपारी अवचित कधी
अबोल कळ्या ओठांवरच्या,
आतल्या आत सुकण्याआधी
मौनातूनच होतात व्यक्त
गुपितं अंतरी दडलेली
ओल्या देहाची अबोल भाषा
मनात अलगद रुजलेली

असा हा पहिला पाऊस प्रत्येक वर्षी येतो आणि आठवणींचं बीज मनात रुजवून जातो. आषाढातला पाऊस हा कालिदासाच्या ‘मेघदूता’तल्याप्रमाणे प्रेयसीच्या भेटीसाठी सैरभैर झालेला असतो, तर श्रावणातला पाऊस बालकवींच्या ‘श्रावणमासी’ कवितेसारखा अलवार जाणवतो.

पावसाचं आणि कवीचं नातं किती अतूट असतं हे रानकवी ना. धें. महानोर एका कवितेत म्हणतात…

येता पावसाळी झड, न्हाली गुलालात माती
पंखपिवळ्या पानांत, थेंब थेंब झाले मोती
कवितेत पावसाचे अनेक रंगरूप अनुभवायला मिळतात. ‘पावसाच्या कविता’ वाचताना ओलंचिंब व्हायला होतं आणि त्या पावसामध्ये माझ्या पावसाचे काही थेंब मिसळतात. तो पाऊस मी अनुभवलेल्या माझ्या रानातील पावसात मला भेटतो तो असा…

रानफुलांचे बांधून पैंजण
नाच नाचतो माझ्या सुरावर
ओढ अनामिक रुजवुनी जातो
जादू करतो खुळ्या मनावर

असा हा मनावर जादू करणारा खुळा पाऊस प्रत्येक वर्षी येतच राहील आणि त्याच्या ओल्याचिंब स्पर्शाने कवितेच्या ओळी नवीन शरीर धारण करून इंद्रधनुषी रंगांत आपलं अस्तित्व शोधत राहतील. काळीज घेऊन जाणारा पाऊस पुन्हा काळीज द्यायला येईल आणि हे पा असंच युगानुयुगे चालत राहील.
[email protected]