मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे महाराष्ट्रातील पहिले टेंडर निघाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबई ते अहमदाबाद धावणाऱ्या हायस्पीड बुलेट ट्रेनच्या बीकेसी ते ठाण्यातील शिळफाटा अशा 21 कि.मी. बोगद्याचे ट्रेंडर काढण्यात आले आहे. हे महाराष्ट्रातील पहिले टेंडर असून संपूर्ण 21 किलोमीटरच्या बोगद्यापैकी 7 कि.मी.चा भाग हा ठाण्याच्या खाडीखालून जाणार आहे.

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जपानकडून एक लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले. बीकेसी ते ठाणे येथील शिळफाटा येथील बोगद्याच्या खोदकामासह दोन मार्गांच्या चाचणी आणि प्रत्यक्ष मार्ग सुरू करण्याच्या कामांचा या टेंडरमध्ये समावेश करण्यात आला आहे. टनेल बोअरिंग मशीन आणि नव्या ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीने हे काम होणार आहे. तांत्रिक निविदा ऑगस्ट 2019 पर्यंत अंतिम होणार असून प्रत्यक्ष काम 2020च्या पहिल्या पंधरवडय़ात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मॅग्रोज सर्व्हे ऑफ इंडिया आणि नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी आदी संस्थांनी या प्रकल्पाचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करून या प्रकल्पामुळे पर्यावरणाची कमीत कमी हानी होणार असल्याचे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने म्हटले आहे.

बुलेटची पहिली ट्रायल 2022
डिसेंबरच्या महिन्यात ठाण्याच्या खाडीत दगडांची तपासणी कररण्यासाठी ‘सेस्मिक टेस्ट’ घेण्यात आली असून त्यातून बुलेट ट्रेनच्या मार्गाची आखणी करण्यात आली आहे. या मार्गाचा 92 टक्के भाग एलिव्हेटेड स्वरूपात जाणार असून सहा टक्के भाग बोगद्यातून तर उर्वरित भाग जमिनीवरून जाणार आहे. 15 ऑगस्ट 2022 मध्ये बिलीमोरा आणि सुरतदरम्यानच्या 50 कि.मी.च्या पट्टय़ात बुलेट ट्रेनची पहिली चाचणी घेण्यात येणार आहे.