
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
सुरक्षेच्या कारणास्तव कर्नाटकने क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयला विनंती केल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेतील लढतींची ठिकाणे बदलण्याचा निर्णय शनिवारी झाला. आता ऑस्ट्रेलियाच्या हिंदुस्थान दौऱ्याची सुरुवात विशाखापट्टणममधून होईल. या मालिकेतील पहिली टी-20 लढत 24 फेब्रुवारीला विशाखापट्टणम येथे होणार आहे. आधी ही लढत बंगळुरूत होणार होती. आता बेंगळुरूत दुसरी टी-20 लढत 27 फेब्रुवारीला होईल.
बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीला ऑस्ट्रेलिया- हिंदुस्थान मालिकेतील लढतीच्या तारखा आणि स्थळांच्या अदलाबदलीची कल्पना देण्यात आली असून समितीने याबाबत कुठलीही हरकत नोंदवलेली नाही. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ हिंदुस्थान दौऱ्यावर दोन टी-20 आणि पाच वनडेंची मालिका खेळणार आहे. पाच वनडे सामने हैदराबाद (2 मार्च), नागपूर (5 मार्च), रांची (8 मार्च), मोहाली (10 मार्च) आणि नवी दिल्ली (13 मार्च) येथे होणार आहेत.































































