
ओमायक्रोन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच शालेय शिक्षण विभागाच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीत मुंबईतील पहिली ते चौथीच्या शाळा आणखी काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, मात्र मुंबई महापालिका क्षेत्रात पाचवी ते सातवीचे वर्ग 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. राज्यभरात डिसेंबरपासून पहिली ते चौथी आणि सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी चाईल्ड टास्क फोर्स आणि आरोग्य विभागानेही हिरवा कंदील दिल्यानंतर शालेय शिक्षण विभाग शाळा सुरू करण्यावर ठाम असून आजच्या बैठकीत शाळांसाठी मार्गदर्शक सूचनाही तयार करण्यात आल्या आहेत. यासंबंधीचा शासन निर्णयही जाहीर झाला आहे.
मागील आठवडय़ात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शहरी भागात पहिली ते सातवी तर ग्रामीण भागात चौथीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर रविवारी सार्वजनिक आरोग्य संचालनालयाने कोरोना प्रतिबंधक मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. आजच्या शिक्षण विभागाच्या बैठकीत शहरी आणि ग्रामीण भागातील कोरोनाची स्थिती आणि शाळा सुरू करण्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. वर्ग भरविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाची तयारी असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले आणि आता शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्यासाठी एकच दिवस उरला असताना मार्गदर्शक सूचनांसंदर्भातील शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
पालकांची सबुरीची भूमिका
ओमायक्रोनच्या दहशतीमुळे पालक वर्गात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारपासून शाळा सुरू होणार असली तरी मुंबईतील काही पालकांनी सबुरीची भूमिका घेतली आहे. मुंबईतील नव्या व्हेरिएंटमुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा अंदाज घेऊनच पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्याचा विचार करू लागले आहेत. तर काही पालकांनी लहान मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लस आल्यावरच शाळेत पाठविण्याची भूमिका घेतली आहे.
शिक्षण विभागाने काढलेल्या मार्गदर्शक सूचना
- थेट शिक्षणावर भर न देता मुलांना शाळेची सवय होऊ द्यावी.
- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या ठिकाणीच शाळा सुरू होणार.
- शिक्षक, शिक्षकेतरांचे 100 टक्के लसीकरण
- पालकांना शाळेच्या आवारात प्रवेश नाही
- जास्त विद्यार्थी असल्यास दोन सत्रांत शाळा
- कोरोना रुग्ण आढळल्यास शाळा पूर्ण बंद
- इतर विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करावी.
- विद्यार्थी, शिक्षकांनी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय टाळावा.
- शाळेच्या आवारात थुंकण्याला कडेकोट बंदी
- पालकसभा ऑनलाइन घ्याव्यात
- विद्यार्थ्यांवर उपस्थितीची सक्ती नाही, पालकांची संमती आवश्यक
- विद्यार्थ्यांनी स्वतःचेच शैक्षणिक साहित्य वापरावे.
- शाळेत वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करावी
- शाळेतून घरी गेल्यावर विद्यार्थ्यांला वैयक्तिक स्वच्छतेच्या सूचना द्याव्यात
- विद्यार्थी, शिक्षकांसाठी समुपदेशन
जिल्हा पातळीवर स्थानिक प्रशासनामार्फत आदेश जारी झाल्यावर मार्गदर्शक सूचनांचे पालन करून शाळा सुरू करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. 1 डिसेंबरपासून राज्यभरात सातवीपर्यंतच्या शाळा सुरू होणार असल्या तरी मुंबई आणि इतर शहरी भागांमध्ये सध्या तरी पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होणार नाहीत. आणखी काही दिवसांनी चौथीपर्यंतच्या शाळांसंदर्भात निर्णय घेतला जाईल. शाळा सुरू करायच्या की नाहीत याचे अधिकार स्थानिक पालिका, जिल्हा प्रशासनाला असतील.
– महेश पालकर, माध्यमिक शिक्षण संचालक
महापालिका आज घेणार निर्णय
मुंबईतील शाळा सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार असल्याचे महापालिका शिक्षण आयुक्त राजू तडवी यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागाचा मार्गदर्शक सूचनांचा शासन निर्णय मिळाला असून त्याआधारे महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांच्याकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे. त्यावर उद्याच निर्णय होईल. मुंबईतील पहिली ते चौथीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढील दहा-बारा दिवसांत घेतला जाईल, असेही तडवी यांनी सांगितले.





























































