
देवगड तालुक्यातील मळई वेळवाडी खाडीपात्राच्या बंधाऱ्याच्या परिसरात खाडी पात्रातील विशिष्ट पट्ट्यातील पाण्याचा रंग पांढरा होत मोठ्या प्रमाणात खाण्यालायक मासे किनाऱ्यालगत आले होते. त्यामुळे जवळच्या परिसरातील नागरिकांनी मासे पकडण्यासाठी गर्दी केली होती. खाडीपात्राच्या किनाऱ्यालगतच मासे आल्याने ते सहज पकडता येत होते.
ही घटना शुक्रवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास भरतीच्या वेळी घडली. त्यावेळी अचानक खाडीतील पाण्याचा रंग विशिष्ट पट्ट्यात बदलून मोठ्या प्रमाणात मासे किनाऱ्याला लागल्याने नागरिकांची चंगळ झाली. यात तांबोशी, शेतुक, गोलीम, चिंगुळ, गुंजले, गणे, पड्यारे, केंड या सारखे मासे ग्रामस्थांनी पकडले. या प्रमाणेच तारामुंबरी खाडीपात्रातही अशा पद्धतीने पाण्याचा रंग बदलला. पात्रात मोठ्या प्रमाणात मासे दिसून आले तर काही मृतावस्थेत आढळले.
याबाबतची माहिती मिळताच नागरिकांसह मच्छीमारही या भागात आले होते. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले तर मासे अशाप्रकारे किनाऱ्याजवळ येत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. त्यानंतर ओहोटी सुरू होताच मासे किनाऱ्यापासून दूर गेले. अशी पद्धतीची परिस्थिती 10 ते 15 वर्षात निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले.




























































