शिवाजी मंडईमधील पुनर्वसनाची लेखी हमी द्या! मच्छीविक्रेत्यांचा आंदोलनाचा इशारा

21

सामना प्रतिनिधी । मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज मंडईची दुरुस्ती करताना पालिकेने इथल्या मच्छीमारांचे स्थलांतर कुलाब्यातच करण्याचे आश्वासन दिले असले तरी याबाबत पालिकेने लेखी हमी द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली आहे. लेखी हमी न देता पालिका प्रशासनाने जर दडपशाही केली तर जोरदार आंदोलन करू, असा इशाराही मच्छीविक्रेत्यांनी दिला.

छत्रपती शिवाजी महाराज मंडईतील मच्छीविक्रेत्या कोळी महिलांचे तात्पुरते स्थलांतर कुलाबा आणि क्रॉफर्ड मार्केट परिसरातच करण्यात येणार आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आयुक्त परदेशी आणि पालिका प्रशासनासोबत घेतलेल्या बैठकीनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याने शेकडो भूमिपुत्र, मच्छीविक्रेत्यांचा रोजगार वाचला असून स्थलांतरणाचे गंडांतर टळले. मात्र संबंधित सहायक आयुक्तांकडून पुनर्वसनाबाबत मच्छीमारांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केला. यावेळी कार्याध्यक्ष बर्नाड डिमेलो, सरचिटणीस संजय कोळी, महिला अध्यक्ष नयना पाटील, दिगंबर वैती, अध्यक्ष किरण कोळी, मार्शल कोळी, विश्वनाथ सालीयन, प्रफुल भोईर उपस्थित होते.

‘टॅक’ कमिटीच्या अहवालानंतरच स्थलांतर

छत्रपती शिवाजी महाराज मंडई धोकादायक असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले असले तरी ‘टॅक’ (टेक्निकल ऍडव्हायझरी कमिटी)च्या अंतिम अहवालानंतर स्थलांतरण करण्यात येणार असल्याचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय इथल्या मच्छीमारांचे स्थलांतर कुलाबा परिसरातच होणार आहे. त्यामुळे मच्छीविक्रेत्यांनी गैरसमज करून न घेता, अफवांना बळी न पडता संयम बाळगण्याची गरज आहे. शिवसेना भूमिपुत्र कोळी बांधवांवर कोणताही अन्याय होऊ देणार नसून नेहमीच त्यांच्या पाठीशी ठाम राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या