
सामना प्रतिनिधी, मुंबई
केंद्र सरकारच्या नौकानयन वाहतूक मंत्रालयाने ‘सागरमाला’ योजनेंतर्गत व्यापारी जहाजांकरिता गुजरातपासून कन्याकुमारी, तामीळनाडूपर्यंत सुमद्रामध्ये प्लॉट टाकून राखीव सागरी मार्ग (फ्री वे)तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुमारे 12 ते 35 नॉटिकल मैल परिसरात मच्छिमारांना मासेमारी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याच्या निषेधार्थ मुंबई, ठाणे, रायगड, दापोली, रत्नागिरीचे पाचशेहून अधिक मच्छिमार मंगळवार, 30 ऑक्टोबर रोजी मुंबईत ये-जा करणाऱ्या व्यापारी जहाजांना ससून डॉक येथे आपल्या नौकांच्या सहाय्याने घेराव घालणार आहेत.
देशात किमान अडीच लाखांहून अधिक तर राज्यात 19 हजार मासेमारी नौका आहेत. त्यांच्यावर दहा कोटी जनता अवलंबून आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे आणि मत्स्य दुष्काळामुळे मच्छिमार आधीच मेटाकुटीला आलेले आहेत. त्यातच आता व्यापारी जहाजांना स्वतंत्रपणे फ्री वे ठेवण्यात येणार असून त्या परिसरात मासेमारी करण्यावर बंदी असणार आहे. त्याचा फटका थेट मच्छिमारांना बसणार आहे. त्याच्या निषेधार्थ मच्छिमार स्वातंत्र्यसेनानी जनार्दन तांबे, एनएफएफचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महाराष्ट्र मच्छीमार कृती समिताचे अध्यक्ष लिओ कोलासो यांच्या नेतृत्वाखाली घेराव आंदोलन करणार असल्याचे महाराष्ट्र मच्छिमार कृती समिताचे सरचिटणीस किरण कोळी यांनी सांगितले.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी समितीचे कार्यध्यक्ष रामकृष्ण तांडेल, खजिनदार रमेश मेहेर, पौर्णिमा मेहेर, उज्ज्वला पाटील, ज्योती मेहेर, राजश्री भानजी, शिवदास नाखवा, दिलीप पागघरे, अमोल रोगे, गणेश नाखवा, चेतन कोळी, परशुराम मेहेर, प्रवीण तांडेल मेहनत घेत आहेत.
मासळी बाजार बंद राहणार
केंद्र सरकारच्या निर्णयाला मच्छिमार पूर्ण ताकदीने विरोध करणार आहेत. त्यासाठी मंगळवारी मासळी बाजार, मासळी विक्री बंद राहणार असल्याचे महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी सांगितले.
summary- fishermen oppose to free coastal way

























































