एलईडी लाईट मासेमारी व बेकायदेशीर पर्ससीन मासेमारी विरोधात मालवणात मच्छीमारांचे उपोषण आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परराज्यातील हायस्पीड ट्रॉलर आणि बेकायदेशीर एलईडी पर्ससीन मासेमारी मुळे त्रस्त असलेल्या पारंपरिक मच्छिमारांनी शुक्रवारी उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले.

दरम्यान, मत्स्य विभागाची कारवाई सुरू आहे. मात्र समुद्रात 12 नॉटिकल बाहेर क्षेत्र हे केंद्र शासनाच्या अखत्यारीत असल्याने त्या ठिकाणी सुरू असलेली मासेमारी आपण रोखू शकत नाही ते अधिकार आपल्याला नाही. असे सहायक मत्स्य व्यावसाय आयुक्त नागनाथ भादुले यांनी स्पष्ट केले. तसेच जे कायद्यात आहे ते करणार असेही भादुले यांनी स्पष्ट केले.

मालवणसह सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील मच्छिमार प्रतिनिधींनी केंद्र सरकारला जागे करण्यासाठी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्ग सहाय्यक मस्य आयुक्त कार्यालय, मालवण येथे बेमुदत साखळी उपोषण छेडले. या उपोषण पार्श्वभूमीवर शुक्रवारी मासे विक्री आणि खरेदी बंद ठेवण्यात आली होती.

आंदोलन ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. यावेळी मच्छिमार बांधवांनी अनेक समस्या, मागण्या मांडल्या. शांततेच्या मार्गाने सकाळी सुरू झालेले आंदोलन दुपारी उशिरा पर्यत सुरू होते. या आंदोलनास ट्रॉलर मालक संघटना मालवणचे अध्यक्ष विकी चोडेकर, संतोष खंदारे व अन्य सदस्य यांनी पाठिंबा दर्शवला.

मच्छिमार आपल्या मागण्यांवर ठाम होते. यावेळी सहायक मत्स्य आयुक्त यांनी सिंधुदुर्ग किनारपट्टीवर बेकायदेशीर मासेमारी सुरू असल्यास त्यावर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले. मात्र आपल्याकडे कर्मचारी संख्या अपुरी, गस्ती नौका मर्यादा लक्षात घेता कारवाई करण्यातील मर्यादा स्पष्ट केल्या. तर केंद्र शासनाच्या सागरी हद्दीत आपल्याला कारवाई अधिकार नसल्याचे त्याठिकाणी प्रामुख्याने सुरू असलेली मासेमारी रोखणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले.

मदत पॅकेज वितरणास लवकर सुरुवात

महाराष्ट्र राज्य शासनाने मच्छिमार बांधवाना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेल्या मत्स्य पॅकेज मधील अटी शिथिल करून पॅकेज वितरण केव्हा सुरू होणार अशी मागणी मच्छिमार बांधवांनी केली. यावर मत्स्य आयुक्त यांनी राज्य शासनाने अटी शिथिल केल्या असून लवकरच पॅकेजचा लाभ मच्छीमाराना देण्यास सुरुवात केली जाईल असे स्पष्ट केले.