जिद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वरद चव्हाण

आशुतोष पत्की. जिद्दीने व्यायाम करून अंडरवेटपासूनचा प्रवास तगडय़ा शरीरयष्टीवर पोहोचलेला आहे.

नमस्कार फिटनेस फ्रिक्स! आजचा आपला फिट सिलेब्रिटी आहे सध्या झी मराठीवरील ‘अगं बाई सासूबाई’ या मालिकेमुळे अनेक तरुणींचा लाडका झालेला, जसे त्यांच्या वडिलांनी अनेक मराठी गाण्यांमध्ये मधुर सूर दिले तसेच यांनी स्वतःच्या आयुष्यात व्यायामाचे सूर पेरले असा आपला लाडका आशुतोष पत्की! आशू आणि माझी 2012 पासूनची ओळख. मी तेव्हा ‘श्रीमंत दामोदर पंत’ या सिनेमाचे शूटिंग करत होतो आणि आशुतोष केदार शिंदे सरांना असिस्ट करत होता. म्हणजेच तो त्या सिनेमात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होता. अभिनयाची व फिटनेसची आवड दिसतच होती, शिवाय अतिशय नम्रपणे सगळय़ांशी बोलायचा. आजही एक सुपरहिट मालिका मिळाल्यानंतरसुद्धा आशूच्या स्वभावात काही फरक पडला नाही हे सांगताना खरंच बरं वाटतं!

लहानपणापासूनच आशूला फुटबॉल खेळायचं प्रचंड वेड होते. शाळेत मधली सुट्टी चालू झाली रे झाली की पाच मिनिटांत आईने दिलेला डबा संपवून उरलेली 20-25 मिनिटे मैदानावर जाऊन फुटबॉल खेळण्यासाठी त्याचा जीव वर-खाली होत असे. याशिवाय कबड्डीचीसुद्धा प्रचंड आवड त्याला होती. शाळा-कॉलेजच्या टीममधून फुटबॉल खेळणे हे त्याचे स्वप्नं होते, पण दुर्दैवाने आशूचं वजन अतिशय कमी होते. म्हणजे अंडरवेट म्हणा ना, आणि हे वजन काही केल्या वाढत नव्हते म्हणून त्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. पण याच बारीकपणामुळे आशूच्या आयुष्यात व्यायामाचं वेड आलं. मित्रहो जेव्हा केव्हा आपण एका अडचणीला सामोरे जातो ना तेव्हा आपले मित्र आणि नातेवाईक हे त्यांच्या नकळत आपल्याला प्रेरणा देऊन जातात. मित्र आपल्याला त्याच समस्येवरून चिडवतात व अशा वेळी आई- बाबांपेक्षाही आपली काळजी आपल्या नातेवाईकांना वाटत असते. ‘अहो, याच करा काहीतरी, बाळा खातोस की नाही नीट!’ असली वाक्य सतत बोलून ते आपल्याला डिवचत असतात. यातूनच प्रेरणा घेऊन आशू नित्यनेमाने व्यायाम करू लागला. मग विविध डाएट गुगलवर सर्च करून नेटवर विविध व्यामाचे प्रकार बघून स्वतः ते करण्याचा प्रयत्न करणे चालू झाले. हे सगळं करत असताना त्याच्या लक्षात आले की, आपल्या शरीराची व विविध व्यायामाची आहाराची अर्धवट माहिती ठेवण्यापेक्षा आपण एखाद्या फिटनेस ट्रेनरचा कोर्स करायला हवा आणि म्हणूनच प्रोफेशनल ट्रेनरचा कोर्स केला.

जेव्हा आशूने अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला तेव्हा आई-बाबांनी त्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला आणि आशूचे एक ऍक्टर म्हणून स्ट्रगल सुरू झाले. आधी अनुपम खेर यांच्या ऍक्टर प्रिपेअरमधून अभिनयाचा कोर्स पूर्ण केला आणि तांत्रिक बाजू नीट समजून घेण्यासाठी केदार शिंदे सरांना एक वर्ष असिस्टंट केलं. अलीकडेच आशूने ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. भाई कोतवाल यांच्या भूमिकेसाठी आशूला 8-10 किलो वजन कमी करणं गरजेचं होतं. यासाठी ट्रायल ऍण्ड एररवर त्याने नेटवर शोधून अनेक डाएट प्लॅन ट्राय करायला सुरुवात केली. प्रत्येकाची बॉडी टेंडन्सी वेगळी असते. आपल्या शरीरासाठी उत्तम काय आहे याचा शोध आपल्याशिवाय इतर कोणीही लावू शकत नाही असे त्याचे ठाम मत आहे. एक कलाकार एखाद्या भूमिकेसाठी स्वतःची तहानभूक विसरतो ना तसे आशूचे भाई कोतवाल यांच्या भूमिकेसाठी झाले होते. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याशिवाय एकही डाएट चीट करायचा नाही असे त्याने ठरवले होतं. पण चित्रपट पूर्ण झाल्यावर मात्र एक आठवडा ‘जे हवं ते खाल्लं’ इंग्रजीमध्ये म्हणतात ना ‘आय डिझर्व्ह इट बिकॉझ आय अर्न इट’ तसे आशूच्या बाबतीत झाले. डायटचे म्हणाल तर आशूला मासे, अंडी, चिकनसारखे हाय प्रोटीन डाएट खायला खूप आवडते. याशिवाय जिममध्ये आपण वेट लायटिंग आणि कार्डिओ दोन्ही समतोल केले पाहिजे असे त्याचे मत आहे. जसा वेटलिफ्टिंगमुळे आपले मसल्स जॉइंटस् मजबूत होतात तसाच कार्डिओमुळे आपले हृदय आपले हार्टसुद्धा एक मसल्स आहे हे विसरून चालणार नाही. या प्रवासात त्याचे जिम ट्रेनर संदीप कडूची त्याला खूप मदत झाली.