मेहनत बॉडीबिल्डिंगसाठी!

588

>> वरद चव्हाण

अभिनेता शशांक दर्णे. पिळदार शरीरयष्टी ही त्याची आवड आणि आता कामाच्या दृष्टीने गरजसुद्धा.

नमस्कार फिटनेस फ्रिक्स. सध्या मी ‘स्टार प्रवाह’वरील ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेत ‘असुर सम्राट जंभासुराची’ भूमिका करतोय! मालिकेच्या शूटिंगदरम्यान माझी ओळख एका अशा माणसाशी झाली जो अभिनय तर उत्तम करतोच, पण त्याची शरीरयष्टीसुद्धा तेवढीच भक्कम आहे. ज्या दिवशी मी पहिल्यांदा सेटवर त्याला बघितले. त्याच दिवशी एक दिवस त्याच्यावर लेख लिहायलाच हवा असं ठरवलं. या आधीच मी ‘श्री दत्ताची’ भूमिका करणाऱया ‘मंदार जाधव’ व याच मालिकेतील ‘रुद्र’ची भूमिका करणाऱया ‘हितार्थ पाटील’ची मुलाखत घेतली होती! म्हटलं देव आणि दत्त भक्ताची मुलाखत तर झाली. आता देवांना त्रास देणारा व देवांवर येणाऱ्या प्रत्येक संकटामध्ये माझा साथीदार असणाऱया खलनायकाचीसुद्धा मुलाखत घेऊन टाकू! तर आजचे आपले ‘फिट’ सेलिब्रेटी आहेत ‘शिशांत शिकंदर दर्णे’ ऊर्फ ‘शशांक दर्णे’.

शशांक हे त्याचं प्रोफेशनल नाव असून त्याचं खरं नाव ‘शिशांत’ आहे. शशांकला शाळेपासूनच फुटबॉल व कबड्डीची प्रचंड आवड होती. शाळेत होणाऱया प्रत्येक कबड्डी व फुटबॉलची टीम शशांकला टीममध्ये घेतल्याशिवाय पूर्ण होत नसत. आता वाढत्या वयात कबड्डी व फुटबॉलसारखे फिजिकली डॅमेजिंग अर्थात अत्यंत मजबूत (लेगस) आणि कोअर (पोटाचे स्नायू) व खूप स्टॅमिना आवश्यक असतो. हे जो माणूस लहानपणीच विकसित करतो. त्यांनी एका चांगल्या शरीरयष्टीचा पाया लहानपणीच रचलेला असतो! पण ‘बॉडीबिल्डिंग’ शशांकच्या आयुष्यात आली ती तो कॉलेजला असताना. सांगतो कसं ते. कॉलेजला असतानाच शशांकला नाटकाचं वेड लागलं आणि रंगमंचावर आपण चांगलं दिसायला हवं म्हणून जो व्यायाम सुरू केला तो थेट बॉडीबिल्डिंगच्या स्पर्धेपर्यंत पोचला. शशांकचे वडील स्वतः एक नाटककार होते. याशिवाय शशांकचे गुरू ‘कै.विजय बारसे’ त्यांच्याकडून शशांकने अभिनयाचे धडे घेतले. नाटकात ‘दीड पायावर’ उभं राहू नये म्हणू शशांकने त्याच्या गुरूंकडून मारसुद्धा खाल्ला आहे. त्यावेळी शशांकची घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. पण बॉडीबिल्डिंग कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्यायचा म्हणजे डाएटवर होणारा मोठा खर्च आलाच. शशांक त्यावेळेस अक्षरशः जे मिळेल ते खात असे. असे करून त्याने अनेक स्पर्धेत नुसता भागच नाही घेतला तर त्यात पारितोषिकसुद्धा पटकावले. अशी मेहनत करत करत शशांकच्या घरी अर्धे ट्रॉफिज अभिनयाची व अर्धे टॉफिज बॉडीबिल्डिंगचे येऊ लागले.

शशांकचे डिस्ट्रीक्ट लेव्हलच्या स्पर्धांपर्यंत आणि सगळय़ात पहिले ट्रेनर म्हणजेच सुनील राणेसर. यानंतर बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे नॅशनल रेफरी असणारे विद्याधर एकबोटे शशांकच्या आयुष्यात आले. या दोघांकडून खूप काही शिकायला मिळाले हे तो आवर्जून सांगतो. आयुष्यभर पुरेल इतके ज्ञान शशांकला त्याच्या गुरूंकडून मिळाले. तेव्हापासून आजपर्यंत एकदाही शशांकला कुठल्याही ट्रेनरची गरज भासली नाही. कमी वेळात बारीक कसं व्हायचं? पूट ऑन अर्थात वजन कसं वाढवायचं? मस्कूलर लूकसाठी काय करायचं? अशा सगळय़ा प्रश्नांची उत्तरे शशांकला त्याच्या गुरूंमुळे आधीच मिळाली आहेत. याच संदर्भातला एक किस्सा म्हणजेच आता स्टार प्रवाहवरील ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेसाठी शशांकचं कास्टिंग कसं झालं आहे. शशांक नुकताच मलेरियासारख्या आजारातून उठला होता. आजारामुळे अर्थातच त्याचं वजन कमी झालं होतं. बरोबर 8 फेब्रुवारी 2019ला शशांकला या मालिकेच्या ऑडिशनसाठी बोलवलं गेलं. 18 फेब्रुवारीला पुन्हा शशांकला बोलावलं गेलं त्यात शशांकला असं स्पष्ट सांगण्यात आलं होतं की, ऑडिशन उत्तम आहे, पण या भूमिकेसाठी त्याला मस्कूलर लूक हवा आहे. एप्रिलपासून शूट होणार होते. शशांकच्या हातात फक्त दीड महिनाच होता. पण त्याच्या गुरूंची शिकवण आणि बॉडीबिल्डिंगमध्ये असलेले त्याचे मित्र यांचा सल्ला घेऊन शशांकने त्याचा व्यायामाचा कोर्स डिझाईन केला. चिकन, मटन, अंडी किती प्रमाणात खावी, याशिवाय बाजारात मिळणारे फूड सप्लिमेंट हे प्रत्येक 6 महिन्यांनंतर अपग्रेड होत असतात.

आपल्याला एक विसरून चालणार नाही की, शशांक आता वयाच्या चाळिशीत आहे. जे अन्न त्याला 5-10 वर्षांआधीपर्यंत चालत होतं ते आता चालणार नाही. त्यामुळे त्याच्या मित्रांचा सल्ला घेऊन अवघ्या दीड महिन्यात त्याने त्याच्या भूमिकेसाठी योग्य मस्कूलर लूक तयार केला. आता जरी शशांक सेलिब्रेटी झाला असला तरी तो त्याच्या जुन्या मित्रांनी केलेली मदत आजही विसरत नाही. या लेखाच्या सुरुवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे शशांककडे बॉडीबिल्डिंगच्या डाएटसाठी पैसे नव्हते दिवसाला 4, 5 अंडीसुद्धा त्याला परवडणारी नव्हती. अशा परिस्थितीत त्याचा मित्र प्रसाद गायकवाड व प्रसादच्या आईने शशांकची खूप मदत केली. ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकेचे शूट जोरदार सुरू असताना शशांकच्या डाएटची संपूर्ण जबाबदारी त्याच्या पत्नीने घेतली आहे. आपला नवरा छान दिसावा, त्याच्या डाएटमध्ये कुठल्याही प्रकारची बाधा येऊ नये म्हणून ती अत्यंत मेहनत घेत आहे. शशांकला बॉडीबिल्डिंग आणि अभिनयातील करीयरसाठी खूप शुभेच्छा!

आपली प्रतिक्रिया द्या