व्यायाम अन् खेळ – ‘‘फूडी’ ऋषीचा फिटनेस मंत्र

>>मानसी पिंगळे

हिंदी-मराठी मालिकांतील लोकप्रिय चेहरा म्हणजे ऋषी सक्सेना. ऋषी त्याच्या फिटनेसचं संपूर्ण श्रेय खेळाला देतो. आवडेल ते सगळं खा, फक्त दररोज किमान एक तास शरीरासाठी काढा…

ऋषीला लहानपणापासून खेळाची आवड आहे. त्याच्या मते, खेळामुळे फिटनेस राखायला मदत होते. डाएट करण्यापेक्षा जास्तीत जास्त व्यायाम केल्याने शरीर संतुलित राहते. त्याचबरोबर शरीराचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी प्रथिने आवश्यक असतात. त्यासाठी प्रोटिन्स पावडर, प्रोटिन्सयुक्त औषधे घेण्याऐवजी रोजच्या आहारात जास्तीत जास्त प्रोटिन्सयुक्त पदार्थ खाणे गरजेचं आहे.

ऋषी जितका फिटनेसप्रिय आहे, तितकाच फूडीसुद्धा आहे. त्याला गोड पदार्थ प्रचंड आवडतात. तो म्हणतो, ‘‘वो प्यार ही क्या, जो दर्द ना दे’’. फिट अँड फाईन दिसण्यासाठी मनावर दगड ठेवून गोड पदार्थांकडे दुर्लक्ष करावं लागतं. गोड पदार्थांमध्ये त्याला उकडीचे मोदक, पुरणपोळी, आंबा बर्फी, त्याचबरोबर जोधपूरचे गुलाबजाम प्रचंड आवडतात. ऋषी मूळचा राजस्थानचा आहे. गोडधोड पदार्थ खातच लहानाचा मोठा झाला. त्यामुळे गोड पदार्थांपासून लांब राहणं त्याला थोडं अवघड जातं, पण स्वतःवर ताबा ठेवावा लागतोच. तो म्हणतो, जर का माझा गोड पदार्थांवरून ताबा सुटला तर मी चांगलाच गुबगुबीत होईन. साखर ही शरीरासाठी हानीकारक. म्हणूनच साखरेचे प्रमाण आहारात फार कमी असावे. कारण वजन वाढायला वेळ लागत नाही, पण वजन आटोक्यात आणण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते.

पुण्याची दाल खिचडी, कोल्हापूरचे नॉनव्हेज

ऋषी त्याच्या दररोजच्या आहारात जास्तीत जास्त प्रोटिन्सयुक्त पदार्थ खाण्यावर भर देतो. त्याचसोबत चिकन, डाळ, भात, भाज्यांचे सलाड, भाकरी या आहारासोबतच पाच ते सहा अंडी. ऋषीला मराठमोळे पदार्थदेखील फार आवडतात. पुणे – कोल्हापूर प्रवासाच्या दरम्यान एका ठिकाणी अतिशय स्वादिष्ट नॉनव्हेज मिळतं. त्या ठिकाणी तो आवर्जून भेट देतोच आणि पुण्यासारखी दाल खिचडी तर त्याने आजवर कुठेही चाखली नाही. मुंबईचं स्ट्रीट फूड तर लाजवाब! ऋषीला मुंबईची पावभाजी आणि मिसळपाव फार आवडतात.

फूडी असलेला ऋषी उत्तम स्वयंपाक करतो. त्याच्या हातच्या चिकन, मटणाला भलतीच मागणी आहे. एकदा त्याने त्याच्या वहिनीच्या हातचे चिकन खाल्ले. ते त्याला फारच आवडले. त्यानंतर ऋषीने ती रेसिपी तिच्याकडून मागवून घेतली आणि त्याच पद्धतीने चिकन बनवून तो मित्रमंडळींना खाऊ घालतो. ऋषीच्या हातचे चिकन लाजवाब अशी ओळख झाली आहे.