
खवल्या मांजराची तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानुसार सापळा रचून वन विभागाने कारवाई केली आहे. तसेच जिवंत खवले मांजर ताब्यात घेण्यात आले असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
29 जानेवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहिती वरून वन्यजीव अधिनियम 1972 अंतर्गत विशिष्ट संरक्षण मिळालेले दुर्मिळ जिवंत खवल्या मांजर विक्रीसाठी काहीजण आणणार असल्याची माहिती मिळाली होती. वन विभागाने सापळा रचून पाच शिकार करणाऱ्यांना ताब्यात घेत अटक केली आहे. तसेच एक जिवंत दुर्मिळ खवल्या मांजर ताब्यात घेण्यात आले आहे. वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य तथा माजी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपरिक्षेत्र अधिकारी भरारी पथकाचे सचिन डोंबाळे यांनी सुरूर फाटा ते वाई दरम्यानच्या रस्त्यावर सापळा रचून कारवाई केली आहे.
एक चार चाकी महेंद्रा झायलो व एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. वाई ते सुरूर फाटा रस्त्यावर हॉटेल वाई वेस्टर्न फूड मॉलजवळ सापळा रचून कारवाई करण्यात आली आहे. आरोपी विक्री करण्यासाठी जिवंत खवल्या मांजर दुचाकीवरून पोत्यामध्ये लपवून घेऊन आले. त्यानंतर ते चारचाकी वाहनातून आले. चारचाकी गाडीमध्ये विक्रीसाठी आल्यावर आणलेल्या पोत्यामध्ये जिवंत खवल्या मांजर असलेली खात्री झाल्यावर तात्काळ कारवाई करत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान एक जण पळून गेला आहे.
दिलीप बाबुराव मोहिते (वय 50 रा.पिंपोडे ता.कोरेगाव), वसंत दिनकर सपकाळ (वय 50 रा. धावडी तालुका वाई), भिकाजी जगन्नाथ सूर्यवंशी (वय 34 रा. भालेकर ता. वाई), प्रशांत भीमराव शिंदे (वय44 या. शिरगाव ता. वाई), अक्षय दिलीप मोहिते (वय 23 रा पिपोड ता कोरेगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून तस्करी करून विक्रीसाठी आणलेले दुर्मिळ खवल्या मांजर जप्त करण्यात आले आहे.
या आरोपींनी यापूर्वी असे अनेक गुन्हे केल्याचे माहिती मिळाली असून अधीक तपास सुरू आहे. नागरिकांनी आपल्या आजूबाजूला वन्यजीव शिकार व तस्करी होत असेल तर गुप्त माहिती नजीकच्या वनविभागास द्यावी. माहीती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल व योग्य बक्षीस देण्यात येईल, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.






























































