
जुहू चौपाटी कोळीवाडा येथे समुद्रात पोहोण्यासाठी गेलेली पाच मुले बुडाल्याची घटना आज सायंकाळी घडली. यावेळी स्थानिकांकडून एकाला वाचवण्यात यश आले, मात्र चार जणांचा शोध लागला नाही. समुद्राला असलेले उधाण आणि रात्रीची वेळ असल्याने अग्निशमन दलाकडून शोधकार्य थांबवण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.
सद्यस्थितीत ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे समुद्राला प्रचंड उधाण आले असून महाकाय लाटा उसळत आहेत. त्यामुळे पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यांजवळ जाऊ नये असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अतिउत्साही पर्यटकांना रोखण्यासाठी लाइफ गार्डसह पोलीस अग्निशमन दलाकडून खडा पहारा देण्यात येत आहे. मात्र सांताक्रूझ जुहू कोळीवाडा या ठिकाणी नजर चुकवून काही पर्यटक समुद्रात जात आहेत. अशाच प्रकारे वाकोला येथील 12 ते 16 वयोगटातील आठ मुले कोळीवाडा समुद्राजवळ गेली होती. मात्र यातील पाच मुले बुडाल्याची घटना सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. यातील दीपेश करन (16, रा. दत्त मंदिर रोड, वाकोला) याला स्थानिक मच्छीमारांनी वाचवले. तर अग्निशमन दल, पोलिसांकडून लाइफ जॅकेट, जेट्सकी, फ्लड रिस्पॉन्स टीम, बोटींच्या माध्यमातून बुडालेल्या मुलांचा शोध घेण्यात आला. मात्र समुद्राला असलेले उधाण आणि काळोखामुळे शोध मोहीम रात्री थांबवण्यात आली. उद्या सकाळपासून बेपत्ता मुलांचा शोध घेण्यात येणार असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून सांगण्यात आले.
शोध न लागलेली मुले
धर्मश वलजित भुजियावय (15), मनीष योगेश भोगनिया (15), शुभम योगेश भोगनिया (16) जय रोशन ताजभरिया (16)
























































