
दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱया पाचजणांच्या टोळीला हत्यारासह गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शोधपथकाला यश मिळाले. पाचही तरुण शहर व परिसरातील आहेत.
उदय सुखदेव कांबळे (वय 24, रा. खोतवाडी), रवींद्र बाळू जाधव (वय 23, रा. कबनूर), युसूफ उर्फ आशिक इलियास गवंडी (वय 18, रा. भोनेमाळ, इचलकरंजी), शीतल रावसाहेब जत्ती (वय 22, रा. योगायोगनगर इचलकरंजी) आणि हसन शेख (वय 25, रा. जवाहरनगर, इचलकरंजी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अलायन्स हॉस्पिटलनजीकच्या बरगेमळा रोडवर कोयते, लोखंडी सुरे, चटणीपूड घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत काही तरुण असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी तातडीने पथकासह धाव घेऊन तरुणांना ताब्यात घेतले. या तरुणांकडे चौकशी केली असता, आम्ही पेट्रोल पंपावरील कामगारांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणार होतो, अशी कबुली दिली. त्यांच्याकडून कोयते, सुरे, चटणीपूड आदी साहित्य जप्त करण्यात आले. तसेच, उदय कांबळेकडे मोबाईल हॅण्डसेट मिळाला. त्याने व रवींद्र जाधवने पाच महिन्यांपूर्वी तो चोरला होता. त्या चोरीची नोंद हातकणंगले पोलिसांत झाली आहे. आरोपींकडील मोटारसायकलही जप्त केली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव, खंडेराव कोळी, संभाजी भोसले, राजीव शिंदे, शहनाज कनवाडे, प्रशात कांबळे, सूरज चव्हाण, महेश खोत, अमर शिरडोणे, संजय इंगवले, रणजित पाटील, राजू कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.





























































