
शॉर्ट सर्किटमुळे सूरतमध्ये एका घराला भीषण लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरल्याने मृत्यू झाला. लिंबायत येथील मिठी खाडीजवळील बेठी कॉलनीमध्ये मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये चार महिला आणि एका चार वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.
घरातील इलेक्ट्रिक स्विचबोर्डमधून ठिणगी उडाल्याने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घरी पॅकिंगचे काम सुरू होते. पॅकिंगसाठी लागणारे फोम शीट घरी साठवून ठेवले होते. या शीटवर ही ठिणगी पडल्याने आग भडकली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. आगीमुळे या साहित्यातून विषारी धूर बाहेर पडला. हा धूर संपूर्ण घरात पसरल्याने कुटुंबातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. बेशुद्धावस्थेत असलेल्या पाचही जणांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.





























































