मुंबईत आणखी पाच मिनी फायर स्टेशन, सुरक्षेसाठी पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईच्या सुरक्षेसाठी पालिका आणखी पाच मिनी फायर स्टेशन सुरू करणार आहे. यामुळे सध्याच्या फायर स्टेशनची संख्या 35 वरून 40 होणार आहे. यामध्ये कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्स येथे कामही सुरू झाले असून इतर मिनी फायर स्टेशनची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची अग्निशमन दल प्रमुख हेमंत परब यांनी दिली.

मुंबईचा औद्योगिक आणि नागरी विकास वेगाने होत असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने यंत्रणांची क्षमता वाढवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये महत्त्वपूर्ण असणाऱ्या अद्ययावत फायर स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘प्रोग्रॅम ऑन एनहान्समेंट ऑफ इमर्जन्सी रिस्पॉन्स’ उपक्रमात ही फायर स्टेशन वाढवण्यात येत आहेत. दरम्यान, मुंबईला अनिसुरक्षेच्या आणखी सक्षम करण्यासाठी लवकरच पूर्व आणि पश्चिम उपनगरासाठी अद्ययावत रोबोट घेण्यात येणार आहेत. शिवाय फायर बाईक, बचावकार्यासाठी उंच शिडय़ाही आणल्या जात आहेत.

या ठिकाणी होणार मिनी फायर स्टेशन

दहिसर कांदरपाडा येथील मिनी फायर स्टेशनचे काम पूर्ण झाले आहे. तर कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्स येथे कामही सुरू झाले आहे. तर सांताक्रुझ, कांजूरमार्ग, माहुल या ठिकाणी सर्व सुविधायुक्त मिनी फायर स्टेशन उभारले जाणार आहेत. यासाठी आवश्यक परवानग्या मिळाल्या असून लवकरच काम पूर्ण होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.