
सामना प्रतिनिधी । पाथरी
चोरट्यानी पाथरी शहरातील गजबजलेल्या मोंढा परिसरातील पाच दुकानाचे शटर वाकवून फोडल्याची घटना आज पहाटे घडली. एकाच रात्रीत चोरट्यानी पाच दुकाने फोडून ६५ हजार रुपयांचा माल लंपास केला आहे. यामुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाथरी शहरातील माजलगाव रोडवरील मोढा परिसरातील संजय पामे याच्या धनलक्ष्मी क्रषी विकास केंद्राचे शटर वाकवून दुकानातील २१ हजार रुपये रोख व सी.सी.टी.व्ही. रेकार्डर असा २६ हजार रुपयाचा ऐवज चोरट्यानी चोरून नेला. या दुकानापासून काही अंतरावर असलेले दत्तात्रय किशन तायनाक याच्या गजानन कृषी केंद्राचे शटर वाकवून दुकानातील १२ हजार रुपयांचा माल लंपास केला. तर याच रोडवरील अशोक कारभारी काळे याचे कोमल प्रोव्हीजन दुकानाचे शटर वाकवून दुकानातील रोख २ हजार २३० रुपये लांबविले. तर येथून जवळच दिनेश महादेवराव वाडकर याच्या दिनेश कृषी सेवा केंद्राचे शटर वाकवून दुकानातील ४ हजार रुपये चोरट्यांनी पसार केले. या घटनेची संजय शंकरराव पामे यानी पाथरी पोलसांत दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी रेणुका वागळे, पोलीस निरीक्षक व्ही.डी. श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक के.बी. बोधगिरे हे करत आहेत. या चोरट्याचा शोध घेण्यासाठी श्वानपथक पाचारण करण्यात आले होते. मात्र ते चोरट्यांचा माग काढण्यात अयशस्वी ठरले.































































