
‘तो आणखी किती चिमुकल्यांचे जीव घेणार, एकतर बिबट्याचा बंदोबस्त करा, नाहीतर आम्हाला मारून टाका,’ हा संताप व्यक्त केला आहे बिबटप्रवण क्षेत्र असलेल्या शिरूर, आंबेगाव, जुन्नर, दौंड यासह अन्य भागांतील स्थानिकांनी.
शिवन्या शैलेश बेंबे असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या चिमुरडीचे नाव आहे. आजोबा अरुण बोंबे यांना घरातून पाणी आणण्यासाठी ही चिमुरडी गेली होती.
शिवन्या शैलेश बोंबे हिला उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, तत्काळ बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे.
पिंपरखेड येथील शेतकरी अरुण देवराम बोंबे यांच्या घरामागील शेतजमिनीचे जेसीबीच्या साह्याने सपाटीकरणाचे काम सुरू होते. यावेळी त्यांची नात शिवन्या ही आजोबा अरुण बोंबे यांना घरातून पिण्यासाठी पाणी घेऊन येत होती. त्यावेळी शेजारील उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शिवन्यावर झडप टाकून उसाच्या शेतात नेले. मुलीने आरडाओरडा केल्याने आजोबांनी उसात धाव घेत बिबट्याच्या तावडीतून शिवन्याला सोडवले. शिवानीच्या मानेला व गळ्याला मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. प्रथम त्यांनी पारगाव येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी तिला नेले असता पुढील उपचारासाठी मंचर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड जांबुत आदी या दहा किलोमीटर परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची ही सातवी घटना असून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे. पाळीव कुत्रे, लहान जनावरे, शेळ्या-मेंढ्यांवर वारंवार बिबट्याचे हल्ले होत असतात. त्यामुळे वन विभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये निष्पाप चिमुकल्यांचे नाहक बळी गेले आहेत. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे रात्रीच्या वेळी आईच्या मागे येणाऱ्या सात वर्षांच्या मुलाला बिबट्याने झडप मारून आईच्या डोळ्यांसमोर उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. गेल्या महिन्यात २५ सप्टेंबर रोजी जुन्नर तालुक्यातील कुमशेत गावात पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या सातवर्षीय चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. जुन्नर तालुक्यात बिबट्याने मुनुष्यावर हल्ला करून ठार केल्याची ही सप्टेंबर महिन्यातील तिसरी घटना होती. काल (दि. ११) जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे रस्त्याने चाललेल्या मेढपाळ तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली असून, बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. तरुणाबरोबर असलेल्या व्यक्तीने बिबट्याला काठीने फटका मारल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. या घटना ताज्या असतानाच आज (दि. १२) बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षांच्या चिमुकलीला जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
पिंपरखेड येथे ज्या ठिकाणी बिबट्याने चिमुकलीवर हल्ला केला, त्या भागामध्ये वन विभागातर्फे १२ पिंजरे लावण्यात येत आहेत. दोन लाइव्ह कॅमेरे, चार ते पाच ट्रॅ प कॅमेरे बसविले असून लवकरात लवकर या नरभक्षक बिबट्याला पकडण्यात येईल. या घटनेचा पंचनामा करून सदर नातेवाईकांना लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
– नीळकंठ गव्हाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूर तालुका.
” सरकारने बिबट राज्य आपत्ती म्हणून घोषित करून बिबट नसबंदी करावी. मी वारंवार राज्याच्या मुख्यमंत्र्यांची यासंदर्भात भेट घेतली असून, अद्यापही मुख्यमंत्री याबाबत निर्णय घेत नाहीत.
डॉ. अमोल कोल्हे, खासदार, शिरूर लोकसभा
माझी नात वाचली नाही म्हणत आजोबांचा हंबरडा
माझ्या नातीवर बिबट्याने हल्ला करताच मीही त्याच्यावर झडप मारली. परंतु, तो उसाच्या शेतात गेला. तिथेही मी त्याच्या अंगावर झडप मारून मोठ्याने ओरडलो. त्यानंतर बिबट्याने तिला सोडून उसाच्या शेतात पळून गेला. अखेर माझी नात शिवन्या वाचली नाही, असे म्हणत आजोबा अरुण बोंबे यांना अश्रू अनावर झाले