मुलुंडमधील बोगस कॉल सेंटर उद्ध्वस्त, पाच जणांना अटक

मुलुंड पश्चिमेकडे बोगस कॉल सेंटर थाटून अमेरिका व कॅनडातील नागरिकांना आर्थिक चुना लावणाऱयांचा गोरखधंदा मुलुंड पोलिसांनी उद्ध्वस्त केला. त्या बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी पाच जणांना बेडय़ा ठोकल्या. पोलिसांनी घटना स्थळावरून मोबात्त्ईल, लॅपटॉप, राउटर्स व रोकड जप्त केली आहे.

मुलुंड कॉलनी परिसरात कॉल सेंटर थाटून काही तरुण अमेरिकास्थित बँकेचे अधिकारी असल्याचे भासवतात व अमेरिका व कॅनडाच्या नागरिकांना पे डे तत्त्वावर तत्काळ कर्ज उपलब्ध करून देऊ, असे आमिष दाखवत आर्थिक फसवणूक करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांना मिळाली. त्यानुसार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शिवाजी चव्हाण, सपोनि सुनील कारंडे, मनोज पाटील, उपनिरीक्षक शिवानंद आपुणे आदींच्या पथकाने मुलुंड कॉलनीतील एका घरामध्ये सुरू असलेल्या कॉल सेंटरवर छापा टाकला.