
बापू सुळे, मुंबई
राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना आता टेट्रा पॅकिंगचे सुगंधी दूध मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून टेंडर प्रक्रियेत अडकलेल्या दूध खरेदी प्रक्रियेला अखेर आदिवासी विकासमंत्र्यांनी अंतिम मंजुरी दिली. त्यामुळे महानंद डेअरी, पराग डेअरी, वारणा डेअरी आणि प्रभात डेअरी दररोज 36 हजार लिटर दूध उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे महिनाभरात तब्बल एक लाख 81 हजार विद्यार्थ्यांना सुगंधी दुधाचा लाभ मिळणार आहे.
आदिवासी विभागाच्या राज्यातील 528 आश्रमशाळांमध्ये 1 लाख 81 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना पोषणआहारांतर्गत सुगंधी दूध देण्याचा निर्णय सरकारने दोन वर्षांपूर्वी घेतला होता. त्यानुसार सुगंधी दुधाच्या खरेदीसाठी आदिवासी विकास आयुक्त नाशिक यांनी 5 नोव्हेंबर 2018 मध्ये टेंडर मागवले होते, मात्र वेगवेगळय़ा कारणानी ही टेंडर प्रक्रिया लाल फितीत अडकल्याने विद्यार्थ्यांना सुगंधी दुधापासून वंचित राहावे लागत होते. मात्र नवनिर्वाचित आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी टेंडर प्रक्रियेत अडकलेली दूध खरेदी हातावेगळी करून पराग डेअरीकडून 18 हजार 108 लिटर, प्रभात डेअरीकडून आठ हजार 384 लिटर, महानंद डेअरीकडून पाच हजार 332 लिटर तर वारणा डेअरीकडून चार हजार 391 लिटर सुगंधी दुधाची खरेदी करण्यास अंतिम मंजुरी दिली आहे. तसेच संबंधितांशी योग्य करार करून महिनाभरात दूध उपलब्ध करून देण्याचे आदेश आदिवासी आयुक्तांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच हा पुरवठा पुढील तीन वर्षे चालणार आहे.
दुधाचा दर 85-90 रुपये लिटर
टेट्रा पॅकिंगच्या सुगंधी दुधाचा दर 85 रुपयांपासून 90 रुपयांपर्यंत निश्चित झाला आहे. 200 मिली दुधाचा एक पाऊच असून संबंधित डेअरीला प्रत्येक शाळेत दूध पोहोचवावे लागणार आहे. त्यानुसार 90 रुपये लिटर दराने महानंद डेअरी ठाणे विभागाला दूध पुरवणार असून नाशिक विभागात प्रभात डेअरी सुमारे 86 रुपये 50 पैसे लिटर दराने दुधाचा पुरवठा करणार आहे. तसेच पराग आणि वारणाही त्याच दराने पुरवठा करणार आहे.
‘महानंद’चा व्यवसाय 15 कोटींनी वाढणार
महानंद डेअरी दररोज पाच हजार लिटर दूध 90 रुपये लिटर दराने ठाणे विभागात पुरवठा करणार आहे. त्यामुळे वर्षाला दीड ते पावणेदोन लाख लिटर दुधाची विक्री होणार असून डेअरीचा व्यवसाय 14-15 कोटीनी वाढणार असल्याची माहिती महानंदच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.





























































