लग्नाला आला अन तावडीत सापडला! सहा वर्षांपासून पसार असलेला अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फसवणूकीच्या गुन्ह्यात मागील सहा वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. लग्नसमारंभात आल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.

2016 मध्ये डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात तो पसार झाला होता. मात्र, तपास पथकाला त्याची माहिती मिळताच अटक केले आहे. सन्मान बाबासाहेब मापारे असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या सुचनेनुसार फरार आरोपींविरूद्ध विशेष शोध मोहीम राबविली जात आहे. त्या अनुषंगाने डेक्कन पोलीस पसार आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी 2016 मध्ये दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यातील सन्मान मापारे एका लग्नसमारंभात आल्याची माहिती डेक्कन पोलिसांच्या तपास पथकाला मिळाली.

त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मापारे याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान पवार, सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे यांच्या पथकाने केली.