सिस्टीममध्ये बिघाड: देशभरातील विमानसेवा विस्कळीत, चेक-इनवर परिणाम; हैदराबाद विमानतळावर गोंधळ

flights delayed india airport check-in system glitch microsoft windows outage hyderabad airport chaos

देशातील अनेक विमानतळांवर बुधवारी सकाळी सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे चेक-इन प्रणाली विस्कळीत झाली, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे. या तांत्रिक अडचणींमुळे काही विमानांना विलंब झाला आहे, असे सूत्रांनी पीटीआयला सांगितले.

वाराणसी विमानतळावर एका सूचना फलकाद्वारे प्रवाशांना कळवण्यात आले की, ‘जगभरात मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या प्रमुख सेवा खंडित झाल्या आहेत. त्यामुळे विमानतळांवरील आयटी सेवा/चेक-इन यंत्रणेवर परिणाम झाला आहे’.

या सूचनेनुसार, इंडिगो (IndiGo), स्पाईसजेट (SpiceJet), अकासा एअर (Akasa Air) आणि एअर इंडिया एक्सप्रेस (Air India Express) या किमान चार विमान कंपन्यांना विमानतळावर फटका बसला. मायक्रोसॉफ्ट किंवा विमान कंपन्यांकडून यावर त्वरित कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. विमान कंपन्यांनी कामकाज सुरळीत ठेवण्यासाठी मॅन्युअल (हस्तचलित) चेक-इन आणि बोर्डिंग प्रक्रिया सुरू केल्याचे वृत्त आहे.

हैदराबाद विमानतळावर गोंधळाचे वातावरण

या तांत्रिक बिघाडामुळे हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. बुधवारी सकाळी या विमानतळावरील एका व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी विमान कंपनीच्या मदत कक्षाभोवती जमा झालेले दिसले आणि ते आपल्या विमानांच्या माहितीसाठी कर्मचाऱ्यांकडे विचारणा करत होते. विमानांना झालेल्या विलंबामुळे संतप्त झालेले प्रवासी तिकीट आणि मोबाईल फोन घेऊन व्हिडिओ रेकॉर्ड करत होते. कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवाशांनी आवाज चढवला. कर्मचाऱ्यांनी निश्चित माहिती द्यावी अशी मागणी प्रवासी सातत्याने करत असल्याचे कळते.

दरम्यान, बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरही विमानसेवेचे कामकाज मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले. चार विमानांना विलंब झाला, तर इंडिगोच्या अनेक सेवा रद्द करण्यात आल्या. कंपनीने एकूण ४२ उड्डाणे रद्द केली, ज्यात २२ आगमन (arrivals) आणि २० निर्गमन (departures) विमानांचा समावेश होता.

दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (DIAL) ने देखील बुधवारी सकाळी X (ट्विटर) वर एक सूचना पोस्ट केली आणि सांगितले की, काही देशांतर्गत विमान कंपन्यांना सेवा प्रणालीत आव्हानांचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे विमानांना विलंब किंवा वेळापत्रकात बदल होऊ शकतो. डीआयएएलने सकाळी ७.४० वाजता X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘आमचे ऑन-ग्राउंड पथक सर्व विमान कंपन्यांसोबत तसेच विविध सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांसोबत उपयांवर काम करत आहेत, जेणेकरून प्रवाशांना सुरळीत आणि कार्यक्षम अनुभव मिळेल.’

विमान कंपन्यांनी दिली माहिती

विमान कंपन्यांनीही एकूण परिस्थितीबद्दल माहिती दिली. एअर इंडियाने X वरील नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये याची पुष्टी केली की, ‘थर्ड पार्टीने यंत्रणा दुरुस्त झाल्याचे स्पष्ट केले असून सेवा पूर्णपणे पूर्ववत झाली आहे आणि आता सर्व विमानतळांवर चेक-इन सामान्यपणे सुरू आहे’.

एअर इंडियाने म्हटले, ‘थर्ड पार्टीची प्रणाली पूर्णपणे पूर्ववत झाली आहे आणि सर्व विमानतळांवर चेक-इन सामान्यपणे सुरू आहे. आमची सर्व विमाने वेळापत्रकानुसार कार्यरत आहेत. प्रवाशांनी दाखवलेल्या संयमाबाबत आम्ही त्यांचे आभारी आहोत.’

दुसरीकडे, इंडिगोने सांगितले की, ‘तंत्रज्ञानातील त्रुटी, विमानतळावरील गर्दी आणि कार्यप्रणालीच्या गरजा यांसारख्या विविध कारणांमुळे गेल्या काही दिवसांत त्यांना अनेक वेळा विमानसेवांना विलंब आणि काही वेळा तर सेवा रद्द करावी लागली असे निर्णय घ्यावे लागले आहेत’.

इंडिगोने सांगितले, ‘चेक इन, तसेच विमानसेवा शक्य तितक्या लवकर सामान्य व्हावे यासाठी आमच्या टीम कार्यरत आहेत. परिश्रम घेत आहेत. याशिवाय, प्रभावित ग्राहकांना लागू असलेल्या नियमांनुसार पर्यायी उड्डाण पर्याय किंवा परतावा (refund) दिला जात आहे’.

गेल्या महिन्यात दिल्ली विमानतळावरही तांत्रिक बिघाड

गेल्या महिन्यातही अशीच एक घटना घडली होती, जेव्हा दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वयंचलित संदेश स्विचिंग प्रणाली (AMSS) मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ८०० हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांना विलंब झाला होता.