
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने क्विक कॉमर्स, फिनटेक आणि एआय क्षेत्रातील विस्तारावर लक्ष केंद्रित केले असून कंपनी 5 हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. फ्लिपकार्टच्या ‘फ्लिपस्टर कनेक्ट’ याअंतर्गत झालेल्या बैठकीत एचआर सीमा नायर यांनी ही घोषणा केली. ही भरती फ्लिपकार्ट मिनिट्स (हायपरलोकल डिलिव्हरी सेवा) आणि सुपर डॉट मनी (फिनटेक मंच) यांसारख्या नवीन उपक्रमांना बळकटी देण्यासाठी आणली जात आहे.
अहमदाबाद, बंगळुरू यासह महाराष्ट्रातील पुणे, मुंबई आणि नाशिकसारख्या प्रमुख शहरांमधील तरुणांसाठी ही भरती रोजगाराच्या नवीन संधी घेऊन येत आहे. फ्लिपकार्ट मिनिट्स ही सेवा किराणा आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू अवघ्या 30 मिनिटांच्या आत ग्राहकांपर्यंत पोहोचतात. ही सेवा ब्लिंकिट, झेप्टो आणि इन्स्टामार्टला टक्कर देते. फ्लिपकार्ट मिनिट्स खूप चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे कंपनीने नवीन भरती करण्याचा निर्णय घेतला आहे, असे फ्लिपकार्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण पृष्णमूर्ती म्हणाले.