पूरस्थितीमुळे आयटीआयच्या प्रवेशप्रक्रियेची मुदत वाढविली

239

पावसामुळे राज्यातील विविध भागांत निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे आयआयटीच्या प्रवेशप्रक्रियेची मुदत वाढविण्यात आली आहे. सध्या चौथ्या फेरीत निवड झालेल्या उमेदवारांची प्रवेशप्रक्रिया सुरू असून पावसामुळे त्यांना कॉलेजमध्ये उपस्थित राहता येत नाही. त्यामुळे उद्या 14 ऑगस्टपासून सुरू होणारी समुपदेशन फेरी आता 17 ऑगस्टला होणार आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वेबसाईटवर आयटीआयचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवार व नव्याने अर्ज केलेल्या उमेदवारांची समुपदेशन फेरीसाठी गुणवत्ता यादी 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर होणार आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी संस्थास्तरीय समुपदेशन फेरी 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे, तर खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील संस्था स्तरावरील प्रवेश 13 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहेत. विविध अभ्यासक्रमांच्या उपलब्ध जागांची माहिती http://admission.dvet.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

राज्यातील 44 नवीन व 45 अस्तित्वात असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील नव्याने मान्यता मिळालेल्या तुकडय़ांमध्ये सुधारित वेळापत्रकानुसार प्रवेश होणार आहेत.सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास तसेच खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेंतर्गत सुधारित वेळापत्रकानुसार प्रवेश घेता येईल.

दोन वर्षांत अडीच हजार विद्यार्थ्यांचा आयआयटीला रामराम ,मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जारी केला अहवाल

गेल्या दोन वर्षांत 2 हजार 461 विद्यार्थ्यांनी आयआयटीला तर 99 विद्यार्थ्यांनी आयआयएमला रामराम ठोकला आहे. यातील सर्वाधिक विद्यार्थी हे आयआयटी दिल्लीतील आहेत. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या एका अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे. आयआयटी दिल्लीतील सर्वाधिक 782 तर इंदूरमधून आयआयएमचे 17 विद्यार्थी बाहेर पडले आहेत.

आयआयटी दिल्लीमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी 111 एससी, 84 एसटी, 161 ओबीसीचे विद्यार्थी आहेत. तसेच आयआयएम इंदूरमधून बाहेर पडणाऱ्या 17 विद्यार्थ्यांपैकी 9 जण आरक्षित प्रवर्गातील आहेत. आयआयएम काशीपूरमधील 13 विद्यार्थ्यांनी कॉलेज सोडले असून यातील 11 विद्यार्थी ओबीसी आणि दोन जण एसटी प्रवर्गातील आहेत.

वाढत्या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांची सुमार कामगिरी

आयआयएम इंदूरचे संचालक हिंमाशू राय यांनी सांगितले, ‘खुल्या प्रवर्गातील विद्यार्थीही कॉलेज सोडत आहेत. विद्यार्थी गळतीची अनेक कारणे आहेत. जे विद्यार्थी पहिल्यांदाच घरच्यांना सोडून हॉस्टेलमध्ये राहतात अशा विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या स्पर्धेचा दबाव असतो. त्यामुळे त्यांची कामगिरी सुमार होते.’

आरक्षण; कॉलेज सोडण्याचे कारण?

आयआयटी सोडणारे आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणारे गुण हे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांएवढेच किंवा त्यापेक्षा जास्त आहेत. मात्र आरक्षणामुळे या विद्यार्थ्यांना आयआयटीत प्रवेश घेण्यासाठी लागणारी टक्केवारी खुल्या प्रवर्गापेक्षा कमी असते. त्यामुळे आयआयटीत आरक्षित प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग असे दोन गट पडले आहेत. कमी गुण मिळाल्यावरसुद्धा आयआयटीत प्रवेश मिळत असल्याने हे आरक्षित गटातील विद्यार्थी दबावाखाली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या