पूर ओसरतोय; चिखलातून मार्ग पण रोगराईची भीती, आता संसार उभारण्याची धडपड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रकाश कांबळे / शीतल धनवडे  । सांगली/कोल्हापूर

महापुराने वेढलेल्या सांगली, कोल्हापूर जिह्यात पाणीपातळी हळूहळू कमी होत आहे. शहरांत, गावांमध्ये चिखल, घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून रोगराई मोठ्या प्रमाणावर पसरण्याची भीती आहे. हजारो घरांमध्ये अक्षरशः चिखल साचला. पै पै जमवून उभा केलेला संसार वाहून गेला. आता नव्याने संसार उभा करण्याची धडपड करावी लागणार आहे. दरम्यान, वीज, पाणी, एटीएम, एसटी सेवा बंदच आहे. पुणे, मुंबईसह राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे.

सातव्या दिवशी सांगलीत सोमवारी कृष्णा नदीची पाणीपातळी 50 फूट होती. तीन दिवसांत अवघी आठ फूट पाणीपातळी उतरली. पूर्ण पूर ओसरायला गुरुवार उजाडेल अशी शक्यता आहे. कोल्हापुरात पंचगंगेची पाणीपातळी दोन दिवसांत सात ते आठ फुटांनी कमी झाली. सोमवारी सायंकाळी सात वाजता राजाराम बंधारा येथील पाणीपातळी 47 फूट 9 इंच होती. सांगली शहरात आणि कृष्णा, वारणाकाठी गेल्या आठ दिवसांपासून महापुराने दैना उडवली आहे. पूर हळूहळू ओसरत असला तरी या पुराने प्रचंड नुकसान केले आहे. 12 फूट पाण्याखाली गेलेला परिसर हळूहळू मोकळा श्वास घेऊ लागला आहे. सांगली शहरातील अनेक भागांत आजही पाणी साचून असल्याने नागरिकांना तिथपर्यंत पोहचणे मुष्कील होत आहे. जिथे पुराचे पाणी ओसरले आहे अशा भागात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. शहर स्वच्छतेची मोहीम महापालिकेने सुरू केली असली तरी सक्षम यंत्रणा आणि पुरेशा मुनष्यबळाअभावी या मोहिमेने अद्यापि गती घेतलेली नाही. त्यामुळे संपूर्ण शहरभर दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य आहे.

रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ

महापुराच्या पाण्यामुळे शहरात निर्माण झालेल्या दुर्गंधीमुळे रुग्णांची संख्या लक्षणीय वाढू लागली आहे. खासगी रुग्णालये आणि शासकीय रुग्णालये फुल झाली आहेत. 100 डॉक्टरांचे पथक शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत असले तरी रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे एका संकटातून मुक्त झालेल्या नागरिकांसमोर हे नवे संकट निर्माण झाले आहे. रोगराई पसरू नये म्हणून शासकीय यंत्रणा कार्यरत असली तरी अनेक लोकांना आजारांना सामोरे जावे लागत आहे.

वीज, पाणी प्रश्न कायम

महापुरामुळे शहरातील अनेक भागांत विद्युत पुरवठा खंडित केला होता. पुरामुळे अनेक विद्युत संच बिघडल्याने पूर ओसरला तरी आजही अनेक भागांत विद्युत पुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही. त्यामुळे अनेक भागांत आजही अंधाराचे साम्राज्य आहे तर जॅकवेल व पंपिंग स्टेशन पाण्याखाली गेल्यामुळे गेले आठ दिवस संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. पुराचे पाणी ओसरत असले तरी पंपिंग स्टेशन अद्यापि पाण्याखाली असल्याने पाणीपुरवठा सुरू होऊ शकलेला नाही. त्यामुळे पाणी पाणी म्हणून टाहो फोडण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. ग्रामीण भागातही जनतेचे पाण्यावाचून प्रचंड हाल होत आहेत.

अन्नाची नासाडी; मदतीचे नियोजन हवे

मदत केंद्रांतील नागरिकांना अन्नाची प्रचंड मदत होत आहे. या अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. तसेच बाहेरूनही मोठ्या प्रमाणात मदत येत आहे. या मदतीचे योग्य नियोजन करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत असले तरी अद्यापही ही मदत नको त्याच्या हातात जात आहे.

 शिरोळमधील स्थिती ‘जैसे थे’

  • कोल्हापूर जिह्यात शिरोळ आणि परिसरातील पूरस्थिती ‘जैसे थे’ आहे. आजही पाच फूट पाणी 26 गावांमध्ये आहे. नृसिंहवाडी, कुरुंदवाड, छिद्रापूर, औखाडी, गणेशवाडी आदी गावांमधील पूर ओसरण्यास आणखी 3-4 दिवस लागतील.
  • मातीच्या घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. अक्षरशः चिखल झाला आहे.
  • एनडीआरएफ, नौदल, लष्कराकडून मदत पोहचविली जात आहे. जीवनावश्यक वस्तू दिल्या जात असल्या तरी सर्वत्र मदत मिळालेली नाही. पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती आहे.
  • कोल्हापूर शहरातील शेकडो घरांची पडझड झाली. हजारो लोकांचा संसार वाहून गेला.
  • पंचगंगानजीकच्या चिखली, आंबेवाडी आदी गावांमधील पूर ओसरलेला नाही. घरांची मोठी पडझड झाली आहे.

दुर्गंधी, रोगराई : कीटकनाशकांची गरज

महापुरात शेकडो गाई, म्हशी वाहून गेल्या. 50 ते 80 कि. मी.पर्यंत जनावरे वाहून गेली. जनावरांमुळे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. त्यातच गोम मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. रोगराई पसरू लागली आहे. स्वच्छतेसाठी पूरग्रस्तांना फिनेल, नेट, ऑल आऊटसह कीटकनाशकांची मोठी गरज आहे.

कोल्हापुरात बंदी आदेश

महापुराची स्थिती आणि विविध सण, उत्सव या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात बंदी आदेश जिल्हा प्रशासनाने लागू केला आहे. पूरग्रस्त आणि नागरिक यांच्यात गोंधळ उडण्याची शक्यता आहे. या काळात ठिय्या आंदोलन, आमरण उपोषण, मोर्चे, आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे बंदी आदेश लागू केल्याची माहिती अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय शिंदे यांनी दिली.

मगरी व सापांची दहशत

नदीपात्रातून बाहेर पडलेल्या मगरींची दहशतही  वाढू लागली आहे. शहरातील नागरी भागांत मगरींचा वावर दिसून येत आहे. मगरींबरोबरच सापांची संख्याही लक्षणीय आहे. पाण्यात उभ्या असलेल्या बंद मोटारींतून हे साप येत आहेत. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाणी ओसरत आहे तसे जनावरांचे मृतदेह मिळत आहेत. कुत्री, डुकरे, गाढव, गाई, म्हशी आदी प्राण्यांचे मृतदेह मिळत आहेत. आज कृष्णा कॉम्प्लेक्स येथे एका पुरुषाचा मृतदेह मिळाला. अद्यापि त्याची ओळख पटलेली नाही.  

पुणे-बंगळुरू महामार्ग सातव्या दिवशी सुरू

  • शिरोली फाटा येथे दीड ते दोन फूट पाणी कमी झाल्यानंतर पुणे-बंगळुरू महामार्ग वाहतुकीसाठी आज अखेर सातव्या दिवशी सुरू झाला.
  • आज एकेरी वाहतूक सुरू केली असून हजारो अवजड वाहने बंगळुरूच्या दिशेने रवाना झाली, मात्र पुण्याकडे येणारी वाहतूक अद्याप ठप्पच आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, आमदार अमोल महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले आदींनी महामार्गाची पाहणी केली.
  • महापुरामुळे सातारा ते कर्नाटकातील तवंदी घाट यादरम्यान 35 ते 40 हजार वाहने अडकून पडली होती. यामध्ये मालट्रक, टेम्पो, एसटी बस, खासगी बसेस यासह अनेक वाहने होती. हजारो प्रवासीही अडकून पडले. यावेळी महामार्गाशेजारील गावांतील नागरिकांनी आणि हॉटेल व्यावसायिकांनी चहा, नाश्ता, जेवण, आंघोळीसाठी मदत करून माणुसकी दाखविली.