
एक अशी कार जी रस्त्यावरून चालता चालता अचानक हवेत उडू शकेल… नुसता विचार करूनच रोमांचित व्हायला होतं ना… पण लवकरच अशी फ्लाइंग कार बघायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. कारण फ्लाइंग कारचे नुकतेच ऐतिहासिक उड्डाण घेत एका शहरातून दुसऱया शहराची यशस्वी सफर केली आहे.
एयरकार कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 28 जून रोजी स्लोव्हाकियातील दोन आंतरराष्ट्रीय विमानतळांदरम्यान फ्लाइंग कारने उड्डाण केले. त्यासाठी 35 मिनिटांचा कालावधी लागला. ही कार तीन मिनिटांच्या आत उडणाऱया विमानामध्ये रुपांतरीत होते. त्यात 160 हॉर्स पॉवरचा बीएमडब्ल्यूचं इंजिन बसवण्यात आलं आहे.
एकदा इंधन भरल्यानंतर कार 8200 फूट उंचीवर सुमारे एक हजार किलोमीटरपर्यंत उडू शकते. त्यात प्रोपेलर आणि पॅराशूट लावलेले आहे. हवेत कारचा उडतानाचा वेग ताशी 170 किलोमीटर असेल. हा वेग भविष्यात ताशी 300 किलोमीटरपर्यंत वाढवण्याचा विचार कंपनी करत आहे.
- फ्लाइंग कारला उड्डाणासाठी फक्त दोन मिनिटं आणि 15 सेकंद लागतात. तेवढाच वेळ कारचे रुपांतर विमानात होण्यासाठी लागतो. कारच्या यशस्वी उड्डाणानंतर येत्या काळात महानगरांमध्ये वाहतुकीचा चेहरामोहराच बदलला जाणार आहे. रस्त्यावरची वाहतूक कमी करणे आणि प्रवासाचा वेळ वाचवणे असे दोन्ही उद्देश फ्लाइंग कार साध्य करेल.






























































