
सामना प्रतिनिधी । आष्टी
जनावरांना बार कोडेड टॅग लावणे, अँड्रॉईड बेस्ड स्कॅनिंग करण्याची जबाबदारी स्वतःकडे घेणे, मोठ्या जनावरांना वाढीव 18 किलो तर लहान जनावरांना वाढीव 9 किलो चाऱ्यासाठी अनुक्रमे प्रति जनावर 120 रुपये व 60 रुपये दर करण्याबाबत छावणीचालक आंदोलनासाठी एकवटल्याचे चित्र शुक्रवारी तहसिल कार्यालयात पहावयास मिळाले. संबंधित मागण्यांचे निवेदन आ. सुरेश धस, तहसिलदार हिरामण झिरवाळ यांना देण्यात आल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी चर्चा करुन येत्या सोमवारी यावर तोडगा पाडण्याचे आश्वासन आ. सुरेश धस यांनी दिल्यानंतर छावणीचालकांनी आपला आक्रमक पवित्रा मागे घेतला.
यावेळी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, शासनाने शेतकऱ्यांना न्याय देण्याकरिता शेतकऱ्यांच्या पशुधनास दुष्काळाच्या दाहकतेपासून वाचवण्यासाठी शासकीय अनुदानावर चारा छावण्या सुरु केल्या. मात्र सद्यस्थितीत असलेली तीव्र पाणी-चारा टंचाई लक्षात घेता चाऱ्यासाठी दोनशे कि.मी.वरुन वाहतूक करावी लागते तर पाण्यासाठी चाळीस कि.मी.अंतरावरुन वाहतूक करावी लागते. अशा परिस्थीतीत मोठे जनावर 90 तर लहान जनावरे 45 यामध्ये परवडत नाही. यातच चारा आणणे, पाहणे, वितरण करणे यासाठी प्रचंड मनुष्यबळ व अवांतर खर्च लागतो. शासन नियमाप्रमाणे पशुखाद्य देणे बंधनकारक आहे. यामुळे संस्थांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. यातच बारकोड टॅगिंग,व स्कॅनिंग यासाठी पुरेसे मनुष्यबळ शक्य नाही. तसेच दररोजची मोबाईल अॅपद्वारे मोजदादही शासनाने शासनातील कर्मचाऱ्याकडून करुन घेण्यास आमची हरकत नाही, असे शेवटी या निवेदनात म्हटले आहे. यावेळी छावणी चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























































