नाम फाउंडेशन तर्फे आज बीड जिल्ह्यात पाच ट्रक चारा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड 

सिने अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशन मार्फत दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यात आज पाच ट्रक चारा रवाना झाला. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या जनावरांना या चाऱ्यामुळे मोठा आधार मिळणार असून पश्चिम महाराष्ट्रातील कराड जिल्हा सातारा येथून हा चारा आज जिल्ह्यात पोहोचणार आहे. आज नाम फाऊंडेशनचे समन्वयक राजाभाऊ शेळके आणि अजित देशमुख यांच्या उपस्थितीत या चाऱ्याचे वाटप होणार आहे.

काल कराड येथून नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे या जोडीने या चाऱ्याची रितसर रवानगी केली. दुष्काळी परिस्थितीमध्ये त्यांनी उचललेले हे पाऊल स्वागतार्ह असून यातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणार आहे. तसेच त्यांचे मनोधैर्य वाढणार आहे.

गतवर्षी पर्यंत नाम फाउंडेशन मार्फत तलावातील गाळ काढणे, नदी, नाले खोलीकरण आणि रुंदी करण्यासारखी जलसंधारणाची मोठी मोठी कामे केली आहेत. या वर्षी तीव्र स्वरूपाचा दुष्काळ असल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी चारा पुरविण्याची तयारी केलेली आहे. पहिल्या टप्प्यात पाच ट्रक चारा येऊन दाखल झालेला आहे.

हा चारा पाटोदा तालुक्यातील पारगाव घुमरा, आष्टी तालुक्यातील शिदेवाडी आणि पिंपरखेड आणि शिरूर या ठिकाणच्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. मोफत मिळणाऱ्या या चाऱ्यामुळे यांच्या जनावरांना काही दिवसांपुरता आधार निर्माण होईल. यानंतर देखील मोठ्या प्रमाणात चारा वाटप होणार असून गरजवंत लोकांना हा चारा उपलब्ध करून देण्यात येईल,  असे शेळके आणि देशमुख यांनी म्हटले आहे.